Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विद्यार्थ्यांनी व्यापक बांधिलकी राखून गावाचा विकासासाठी प्रयत्न करावेत:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
गडचिरोलीत गोंडवाना विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ उत्साहात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,12ऑक्टोबर:

गावाचा विकास झाला तर देशाचा विकास होऊ शकेल. हे सुत्र लक्षात घेऊन येथील विद्यार्थ्यांनी व्यापक बांधिलकी राखून भविष्यात प्रयत्न केले तर गडचिरोलीसह परिसराचा निश्चितच विकास होऊ शकेल अशी आशा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात व्यक्त केली. या समारंभात संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक स्व.सुनिल देशपांडे आणि मेंढालेखा येथील ग्रामसभेचे प्रमुख देवाजी तोफा यांना मानव विज्ञान पंडित ही मानद पदवी बहाल करण्यात आली.
गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी  राष्ट्रीय अनुसूचित  जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांचीही उपस्थिती होती. या समारंभात संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक स्व.सुनिल देशपांडे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा येथील ग्रामसभेचे प्रमुख देवाजी तोफा यांना मानव विज्ञान पंडित ही मानद पदवी बहाल करण्यात आली. स्व.सुनिल देशपांडे यांच्या वतीने श्रीमती निरुपमा देशपांडे यांनी ही पदवी स्विकारली.
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये मूलतः मोठी उद्यमशीलता असून तिला अनुरुप वाव देण्यासाठी प्रयत्नांची गरज अधोरेखित करतांना राज्यपाल म्हणाले, निर्सगाच्या कुशीतील या विद्यापीठावरील जबाबदारी मोठी आहे. लोकल ते ग्लोबल या सुत्रानुसार येथील विद्यार्थ्यांनी गावाच्या विकासासोबतच देश आणि जगाच्याही कल्याणाचा विचार करावा. समर्पित भावनेने अविरत प्रयत्न केल्यास आपल्या समाजाचा विकास होऊ शकतो हे लक्षात घेऊन येथील तरुणांनी आत्मनिर्भर व्हावे. स्टार्टअपसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून उद्यमशीलता जोपासून आपल्या परिसराच्या सर्वंकष परिवर्तनासाठी निष्ठेने प्रयत्न करावेत. राज्यातील प्रगत शहरी भाग आणि आदिवासी दुर्गम भाग यात मोठे अंतर आहे. ते भरुन काढण्यासाठी  येथील विकासासाठी नव्या शिक्षित पिढीने स्वावलंबनावर भर देण्याची गरजही त्यांनी प्रतिपादीत केली.
गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये मुलींच्या वाढत्या संख्येबाबत समाधान व्यक्त करुन स्त्रीशक्तीचा त्यांनी विशेषत्वाने गौरव केला. स्व. सुनिल देशपांडे आणि देवाजी तोफा यांच्यासारख्या ध्येयवादी व्यक्तींचे योगदान समाजासाठी  मोलाचेही ठरल्याच्या उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
ज्यांच्या धडपडीमुळे आपण शिक्षणाचा हा टप्पा गाठु शकलो. त्या मात्यापित्यांबद्दल विद्यार्थ्यांनी कृतज्ञता भावना बाळगण्याचे आवाहन करुन श्री. हर्ष चौहान म्हणाले, शिक्षण म्हणजे स्वत:सह  कुटुंब, समाज, गाव समजण्याची संवेदनशील क्षमता विकसित होणे. त्यातून आपण भविष्यात या घटकांसाठी काय करु शकतो याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. गावाचा विकास हा आपल्या विचारांचा केंद्रबिंदु असावा. गावाचा विकास हा बहुआयामी असतो. तो सामाजिक अंगानेही व्हावा. त्यासाठी विविध प्रश्न विद्यार्थ्यांचा मनात निर्माण व्हावेत आणि त्यांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयोगशील व्हावे. हा परिसर आदिवासीबहुल असल्याने केवळ सांस्कृतिक अंगानेच संशोधन करण्यासोबत ज्ञान, तंत्रज्ञान, चिकित्सा अशा विविध दृष्टीकोनातून प्रत्यक्ष व्यवहारात उपयुक्त ठरणारे संशोधनही व्हावे. अशा संशोधनाचा स्थानिक संदर्भात विचार व्हावा आणि विद्यापीठाने त्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
गडचिरोलीसारख्या आदिवासी भागाचा शैक्षणिक विकासासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध आघाडयावर प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करुन पालकमंत्री शिंदे म्हणाले, या परिसराचे मागासलेपण दुर करण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणून शिक्षणाकडे आम्ही पाहत आहोत. विविधांगी विकास करुनच येथील मागासलेपण दूर होऊ शकेल. नक्षलवादाच्या समस्येने पोळलेल्या गडचिरोलीचा विकास हा आमचा प्राधान्याचा विषय आहे. त्या दृष्टीकोनातून गोंडवाना विद्यापीठाच्या गुणात्मक वाढीसाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. एक जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून त्याचा नावलौकिक निर्माण करण्यासाठी सर्व पातळयांवर कृतिशील नियोजन केले जात आहे.  या भागातील वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी आमचे प्रयत्न आहेत. अशी ग्वाही देऊन नेल्सन मंडेला यांच्या शिक्षणविषयक विचारांचा दाखला त्यांनी यावेळी दिला.
कुलगुरु प्रा. श्रीनिवास वरखेडी यांनी स्वागतपर भाषणात विद्यापीठाची गेल्या नऊ वर्षातील वाटचाल विषद केली. ते म्हणाले गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने सुरु झालेल्या गोंडवाना विद्यापीठाने आपल्या मुळ उद्देशाला सार्थ ठरवितांना अनेक स्थानिक आणि वैशिष्टयपूर्ण अभ्यासक्रम आपल्या कार्यपद्धतीत समाविष्ट केले आहे. याशिवाय विविध उपक्रमातून विद्यापीठाची स्थानिक संदर्भातील उपयुक्तता वाढविण्याचे प्रयत्न आहे. भविष्यात अत्याधुनिक स्वरुपाच्या विविध पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी विद्यापीठाचे नियोजन असून त्यानुसार आमचे प्रयत्न सुरु आहेत.
या समारंभात विज्ञान व तंत्रविज्ञान शाखा, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा, मानव विज्ञान शाखा, आणि आंतरविज्ञान शाखेतील सुवर्ण पदक प्राप्त, प्रथम गुणवत्ता प्राप्त, आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  नरेंद्र आरेकर यांनी केले तर  गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी आभार मानले.
खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे आदींसह राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार,   नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस प्रमुख अंकित गोयल आदी यावेळी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.