Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोव्हीड 19 लसीकरणासाठी जिल्हा कृती दल समितीची पहिली बैठक संपन्न

कोव्हीड 19 वरील लस प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी
लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करा.
लस टोचण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम तयार करा
– जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जालना, दि. 7 – कोव्हीड 19 वरील लस लवकरच उपलब्ध होणार असुन पहिल्या टप्प्यामध्ये ही लस आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. जिल्ह्यात टप्प्या-टप्प्याने ही लस प्रत्येक व्यक्तीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करण्याबरोबरच लस टोचण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले.
कोव्हीड 19 लसीकरणासाठी जिल्हा कृती दल समितीची पहिली बैठक आज दि. 7 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. बिनवडे बोलत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष कडले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, कोव्हीड 19 वरील लस लवकरच उपलब्ध होणार असल्याने लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या लसीचे डोस प्रत्येकापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी शासकीय दवाखाने, जिल्हा परिषदेच्या शाळा यासह ईतर उपलब्ध होणाऱ्या जागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरु करावी लागणार आहेत. लसीकरण केंद्रावर तीन रुम असणे आवश्यक असुन पहिल्या रुममध्ये रुग्णांच्या नोंदणीची तपासणी करण्यात येणार आहे, दुसऱ्या रुममध्ये लसीकरण तर तिसऱ्या रुममध्ये लसीकरण केलेल्या व्यक्तीला कमीत कमी अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याने स्वतंत्र अशा तीन रुम असलेली ठिकाणी प्राधान्याने तपासण्यात यावीत. कोव्हीड 19 वरील लसीची थंड जागेमध्ये साठवणुक करणे गरजेचे असल्याने पुरेशा प्रमाणामध्ये कोल्ड स्टोरोजेस माहिती उपलब्ध करुन ठेवावी. कोव्हीड लसीवरील देखरेख व तयारीसाठी शासनामार्फत कोविन नावाचे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असुन या सॉफ्टवेअरच्या वापराबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिले.
कोव्हीड 19 वरील लस जिल्ह्यास प्राप्त झाल्यास लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवुन प्रत्येकापर्यंत लस पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय विभागांबरोबरच रोटरी, आयएमए यांच्यासह जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थांची मदत लागणार आहे. हे लसीकरण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्येकाने एकसंघ तसेच समन्वयाने काम करण्याची गरज असुन कोरोनाच्या काळात प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने उत्कृष्टरित्या काम केले असुन लसीकरणाच्या कामातसुद्धा सर्वजण नियोजनबद्ध व उत्कृष्टरित्या काम करुन लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी करतील, असा विश्वासही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्वप्रथम जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद कोव्हीड 19 लसीकरणाबाबत उपस्थितांना विस्तृत माहिती दिली.
या बैठकीस सर्व डॉक्टर्स, आयएमएचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीं यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.