‘स्वस्थ नारी’चा मानाचा मुकुट : गडचिरोलीला राज्यस्तरीय गौरव
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली/मुंबई, : दुर्गम डोंगररांगांमध्ये, नक्षलग्रस्त छायेत आणि मर्यादित साधनसंपत्तीतही आरोग्य सेवेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याने पुन्हा एकदा राज्यपातळीवर आपली छाप उमटवली आहे. ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत प्रभावी कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याला ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ने गौरविण्यात आले. मुंबईत आयोजित ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न’ व ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.

राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते जिल्ह्याचा विशेष गौरव करण्यात आला. दुर्गम आणि अतिदुर्गम भागात माता-बाल आरोग्य सेवेचे बळकटीकरण, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना आणि डिजिटल पद्धतीने केलेले व्यवस्थापन याची राज्य शासनाने दखल घेतली.
या सन्मानाच्या यादीत प्राथमिक आरोग्य केंद्र, पेरमिलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल कुकुडकर यांना सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरण, जनजागृती मोहिमा आणि गुणवत्तापूर्ण सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘महाआरोग्य सन्मान – २०२६’ प्रदान करण्यात आला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, लाहेरी येथील आशा स्वयंसेविका श्रीमती पार्वती तिम्मा यांना अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात घरोघरी भेट देत माता व बाल आरोग्य सेवा सुनिश्चित केल्याबद्दल राज्यस्तरीय सन्मान मिळाला. त्यांच्या कार्याने ‘आरोग्य सेवा दारात’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.
‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाची अंमलबजावणी ही केवळ मोहीम न राहता जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा पाया बनली आहे. दुर्गम भागातील गर्भवती माता आणि किशोरवयीन मुलींची घरोघरी सर्वंकष तपासणी, हिमोग्लोबिन व रक्तदाब तपासण्या, अॅनिमिया निर्मूलनासाठी लोहयुक्त गोळ्यांचे वितरण, संतुलित आहाराविषयी मार्गदर्शन, तसेच डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीद्वारे लाभार्थ्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा—या सर्व घटकांनी एक समन्वित आराखडा साकारला.
आशा स्वयंसेविकांच्या ‘माता बैठकां’मधून स्तनपान, लसीकरण, स्वच्छता व पोषणाविषयी प्रभावी जनजागृती करण्यात आली. संस्थात्मक प्रसूतीसाठी मातांना आरोग्य केंद्रांपर्यंत सुरक्षित पोहोचविण्याच्या उपाययोजनांमुळे प्रसूतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. या संपूर्ण अभियानासाठी डॉ. स्मिता साळवे व डॉ. प्रेरणा देवतळे यांनी नोडल अधिकारी म्हणून जिल्हाभर प्रभावी समन्वय साधला.
जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे म्हणाले, “भौगोलिक आव्हानांवर मात करत शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचा आमचा निर्धार या पुरस्कारातून अधोरेखित झाला आहे. ‘स्वस्थ नारी’ हेच ‘सशक्त कुटुंबाचे’ मूळ आहे.” जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनीही माता मृत्यू व बाल मृत्यू दर कमी करण्याच्या संकल्पाला या सन्मानामुळे नवी ऊर्जा मिळाल्याचे सांगितले.
तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक आणि विशेषतः आशा स्वयंसेविकांच्या अथक परिश्रमामुळे गडचिरोलीचे नाव राज्यभर अभिमानाने घेतले जात आहे. ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ हा केवळ पुरस्कार नाही; तो दुर्गम भागातल्या सेवाभाव, समन्वय आणि जिद्दीची राज्यस्तरीय पावती आहे.
हे देखील वाचा ,
महिलांच्या सन्मान, सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी समन्वयाने काम करा

