६० कोटींची योजना ‘तहानलेली’च! वडसा दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांचा संताप; कामाच्या संथगतीवर कडक इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विकासाच्या नावाने कोट्यवधींच्या योजना मंजूर होतात, पण जमिनीवर मात्र त्यांची गती कासवगतीनेच—याच वास्तवावर आज वडसा (देसाईगंज) तालुक्यात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या दौऱ्याने ठळक प्रकाश टाकला. ऑनफिल्ड पाहणीत त्यांनी पाणीपुरवठा, कृषी, सूक्ष्म उद्योग आणि पायाभूत सुविधा यांचा सखोल आढावा घेतला; मात्र ६० कोटींच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेची संथ प्रगती पाहून त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत प्रशासनाला ‘जागे’ केले.
देसाईगंज नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेली ही पाणीपुरवठा योजना नागरिकांच्या मूलभूत गरजेशी निगडित असताना तिच्या कामाचा वेग अत्यंत मंद असल्याचे समोर आले. “नियोजित वेळेत योजना पूर्ण झालीच पाहिजे,” असा कडक इशारा देत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना कामाला तातडीने गती देण्याचे आदेश दिले. सुरक्षित आणि नियमित पाणीपुरवठा हा केवळ प्रकल्प नसून नागरिकांचा हक्क असल्याचे त्यांनी स्पष्टपणे अधोरेखित केले.
या दौऱ्यात प्रशासनाचा केवळ आढावा न घेता, विकासाच्या विविध अंगांना चालना देण्याचाही प्रयत्न दिसून आला. कृषी क्षेत्रात शेडनेट, पॉलीहाऊस आणि रोपवाटिका प्रकल्पांची पाहणी करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांनी स्वतःच्या पुढाकारातून उभारलेले उपक्रम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले, तर उत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी अशा प्रकल्पांना अधिक बळ देण्याची गरजही अधोरेखित केली.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचाही त्यांनी आढावा घेतला. सावंगी येथील डाळ मिलला भेट देताना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक करत, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी अशा उद्योगांना अधिक प्रोत्साहन देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. “ग्रामीण उत्पादनाला बाजारपेठ मिळाली, तरच खऱ्या अर्थाने विकास घडेल,” असे त्यांनी नमूद केले.
दौऱ्यादरम्यान विसोरा येथील एसआरपीएफ कॅम्पला भेट देऊन सुरक्षा यंत्रणांचा आढावा घेत, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी समन्वय अधिक मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जवानांच्या सुविधांबाबतही त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पर्यटन पार्क, तलाठी दफ्तार, शाळा आणि इतर विकासकामांची पाहणी करत प्रशासन अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. “विभागीय समन्वयाशिवाय विकास शक्य नाही,” हा स्पष्ट संदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

या दौऱ्यात अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान, तहसीलदार प्रिती डुडुलकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

