Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वांगेतुरीत ‘एक गाव, एक वाचनालय’ अंतर्गत ७३वे वाचनालय सुरू

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. २५ ऑक्टोबर : गडचिरोली पोलीस दलाच्या ‘एक गाव, एक वाचनालय’ उपक्रमांतर्गत हेडरी उपविभागातील मौजा वांगेतुरी येथे ७३ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गावातील नागरिक, विद्यार्थी आणि पोलीस दलाच्या अधिकारी-अंमलदारांच्या सहभागातून हे वाचनालय उभारण्यात आले आहे. या सोहळ्यात ५०० हून अधिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी पारंपारिक वेशभूषेत सहभाग घेत गावातून ग्रंथदिंडी काढली.

सदर वाचनालय पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि स्थानिक नागरिकांच्या श्रमदान व लोकवर्गणीतून बांधण्यात आले असून अभ्यासिका, टेबल-खुर्च्या, पुस्तक कपाटे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वाचनालयामुळे परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांना अभ्यास व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोठी मदत होणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सन २०२३ पासून सुरू झालेल्या ‘एक गाव, एक वाचनालय’ उपक्रमांतर्गत आतापर्यंत ७२ वाचनालये सुरू झाली असून सुमारे ८,५०० युवक-युवतींना त्याचा लाभ झाला आहे. या माध्यमातून आतापर्यंत २०५ विद्यार्थी विविध शासकीय विभागांमध्ये नोकरीस पात्र ठरले आहेत.

उद्घाटन प्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या वाचनालयाचा अधिकाधिक उपयोग करावा. पोलीस दल केवळ माओवादी विरोधात लढा देत नसून नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठीही कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सिआरपीएफ १९१ बटालियनचे असिस्टंट कमांडंट मनोज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी (हेडरी)योगेश रांजणकर, पोलीस स्टेशन वांगेतुरी प्रभारी अधिकारी सपोनि. दिलीप खडतरे, एसआरपीएफ ग्रुप १८ (काटोल) चे पोउपनि. जनार्धन साबळे तसेच सरपंच, पोलीस पाटील, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असिस्टंट कमांडंट मनोज कुमार, सपोनि. दिलीप खडतरे, पोउपनि. किशोर सदुलवार, पोउपनि. आबा काळे, नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व वांगेतुरी पोस्टेतील सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि जिल्हा पोलीस दलाचे अंमलदार यांनी प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.