आत्मसमर्पित माओवादी दाम्पत्याच्या घरी जन्मला ‘आशेचा दिवा’
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलवादमुक्ती आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांना दिशा देणारी हृदयस्पर्शी घटना घडली आहे. हिंसाचाराच्या सावटातून बाहेर पडून आत्मसमर्पण केलेल्या माओवादी दाम्पत्याच्या घरी पुत्ररत्नाचा जन्म झाल्याने त्यांच्या जीवनात नवे आयुष्य, नवी उमेद आणि नव्या अध्यायाची सुरूवात झाली आहे. ‘शस्त्र’ सोडून समाजमुखी पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारलेल्या या दाम्पत्याची कथा आज संपूर्ण जिल्ह्यासाठी सकारात्मकतेचा संदेश ठरली आहे.
१ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यातील मोठ्या आत्मसमर्पण उपक्रमात अर्जुन ऊर्फ सागर ऊर्फ सुरेश तानू हिचामी (डिव्हीसीएम, राही दलम) आणि त्याची पत्नी सम्मी ऊर्फ बंडी पांडू मट्टामी (एसीएम, डॉक्टर टीम, डिके झोन) यांनी आत्मसमर्पण केले. सततचा हिंसाचार, पळपुटेपणा आणि अनिश्चिततेने भरलेले दलममधील जीवन मागे टाकून स्थैर्याकडे टाकलेले हे त्यांचे पहिले पाऊल होते. आत्मसमर्पणानंतर त्यांच्या आयुष्यात सुरक्षिततेची, सन्मानाची आणि कुटुंबवत्सल जीवनाची नवीच सुरुवात झाली.
गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या पुनर्वसन उपक्रमाने या दाम्पत्याला नवजीवनासाठी आधार दिला. वैयक्तिक ओळखपत्रे, बँक खाते, ई-श्रम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रोजगाराभिमुख प्रशिक्षण अशा सर्व सुविधा पोलीस दलाने उपलब्ध करून दिल्या. केंद्र आणि राज्य शासनाच्या पुनर्वसन धोरणांनुसार या दाम्पत्यास एकूण १६.३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली, ज्यामुळे त्यांचे स्वावलंबी आयुष्य घडू लागले.
आज जिल्हा महिला रुग्णालय, गडचिरोली येथे सम्मी हिची प्रसूती होऊन पुत्ररत्नाचा जन्म झाला. दलममध्ये असताना कधीही न अनुभवलेला सामान्य कौटुंबिक आनंदाचा क्षण आज त्यांच्या आयुष्यात वास्तवात आला आहे. शस्त्रासोबत जंगलात भटकणारे हे दोघे आज सुरक्षित वातावरणात पालकत्वाचा आनंद घेत आहेत, ही परिवर्तनाची सर्वोत्तम साक्ष ठरली आहे.
गडचिरोली पोलीस दलाने गेल्या दोन दशकांपासून पुनर्वसन व विश्वास निर्माण करण्याला प्राधान्य दिले असून २००५ नंतर आजपर्यंत ७८३ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. त्यापैकी केवळ २०२५ या वर्षातच १०१ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले, ही या उपक्रमांच्या प्रभावाची जिवंत उदाहरणे आहेत.
अर्जुन आणि सम्मी या दाम्पत्याला पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी भेट देऊन नव्या आयुष्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. हिंसाचाराच्या अंधारातून बाहेर पडून शांततेकडे वाटचाल करणाऱ्या या दाम्पत्याची कथा आज गडचिरोली जिल्ह्यात ‘आशेचा दिवा’ प्रज्वलित करणारी ठरली आहे.

