खून करून जंगलात पुरला मृतदेह… पोलिसांनी ७२ तासांत उघड केला थरारक कट!
बोगाटोला जंगलातील अज्ञात मृतदेह प्रकरण पोलिसांनी उघडकीस आले आहे.कोरची पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून सहा जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ४ फेब्रुवारी :
कोरची तालुक्यातील मौजा बोगाटोला येथील जंगल परिसरात अर्धवट पुरलेल्या अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाच्या मृतदेह प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवून दिली होती. अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह, चेहरा ओळखू न येण्याइतपत विद्रूप झालेला आणि कोणताही ठोस धागा नसल्याने हे प्रकरण पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. मात्र गडचिरोली पोलीस दलाने गुणवत्तापूर्ण तपासाचे दर्शन घडवत अवघ्या ७२ तासांत या निर्घृण खुनाचा छडा लावत पाच आरोपींना अटक केली आहे.
दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी बोगाटोला येथील जंगलात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कोरची व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे तपास सुरू केला. मृतदेहाची अवस्था पाहता ओळख पटवणे आणि खुनामागील कारण शोधणे अत्यंत कठीण होते. वैद्यकीय तपासणीत मानेवर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दि. २ फेब्रुवारी रोजी पोस्टे कोरची येथे गुन्हा क्रमांक १९/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम १०३(१), २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळावरील सूक्ष्म दुवे, गोपनीय बातमीदारांची माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली. तपासात उघड झाले की, जांभूळखेडा (ता. कुरखेडा) येथील शानु पठाण याचे मयत जितू कवंर (वय ३०, रा. जेठकन्हार, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांमध्ये जितू कवंर अडथळा ठरत असल्याने शानु पठाण याने कट रचून आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने जितू कवंर याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात अर्धवट पुरला.
या प्रकरणात आरोपी शानु पठाण (वय ३६), पुंकेश बोरकर (वय ३२), चंद्रशेखर गुज्जेवार (वय २७), धनपाल मडावी (वय २१), सर्व रा. जांभूळखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली तसेच सोनाली कवंर (वय २५, रा. जेठकन्हार, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव, छ.ग.) यांना दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, पोस्टे कोरची हे करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कार्तिक मधीरा, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, पोस्टे कोरचीचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण तसेच कोरची पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

