Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अठू-बोदरी’ धबधबा ठरणार निसर्ग पर्यटनाचं नवसंजीवन, शासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्लक्षित

सिरोंचा जंगलातील ब्रिटिशकालीन रियासत म्हणून ओळखल्या जाणार्‍या नंदनवन उलगडतोय सोशल मीडियावर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

रवि मंडावार, गडचिरोली: सिरोंचा तालुक्यातील बेज्जूरपल्ली-पर्सेवाडा मार्गावर लपलेला ‘अठू-बोदरी’ नावाचा अप्रतिम धबधबा सध्या नव्याने पर्यटकांच्या नजरेत भरू लागला आहे. हा धबधबा वर्षभर वाहणारा असून पावसाळ्यात त्याच्या जलप्रवाहात असामान्य वाढ होते. घनदाट जंगलामध्ये खोल नाल्याच्या कुशीत असलेल्या या धबधब्याचे लोभसवाणे सौंदर्य पाहण्यासाठी छत्तीसगड, तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमावर्ती गावांमधून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. याठिकाणी पसरलेली हिरवाई, कुजबुजणारे प्राणी-पक्षी, आणि संथ पण दाट वेगाने कोसळणारे निर्झर यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींना विलक्षण अनुभूती देणारे ठरत आहे.

‘अठू-बोदरी’ हा केवळ धबधबा नसून जंगल, डोंगर आणि धार्मिक परंपरेचा संगम असलेलं एक नैसर्गिक सांस्कृतिक केंद्र आहे. तेथून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर ‘लिंगो-जॅगो पेंटाणा’ नावाचं आदिवासी श्रद्धास्थान आहे, जे स्थानिक लोकांच्या जीवनपद्धतीशी जोडलेलं आहे. धबधब्याच्या आसपास अजूनही बिबट्या, अस्वल, सांबर, कोल्हे यांचा अधिवास आहे. त्यामुळे येथे जंगलाची गूढता आणि धबधब्याचं प्रखर सौंदर्य एकत्र अनुभवता येतं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या ठिकाणाचं वैशिष्ट्य असं की, येथील शांतता, सभोवतालचं अरण्य आणि वाहणाऱ्या पाण्याचा घनगंभीर नाद हा नैसर्गिक ध्यानसाधनेसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. जंगलवेडे, भटकंती करणारे छायाचित्रकार, आणि साहसी पर्यटक यांच्यासाठी हे ठिकाण लपवलेला खजिनाच ठरतो आहे. मात्र हे सौंदर्य आणि जैवविविधता याचं विलोभनीय दर्शन सध्या केवळ धाडसी पर्यटकांपुरतं सीमित आहे, कारण रस्ता नाही, वाहतूक नाही, सुरक्षा नाही. जेवण, पाण्याची सोय, शौचालय याचा पूर्ण अभाव आहे.

या पार्श्वभूमीवर आता स्थानिक नागरिक, निसर्गप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या धबधब्याच्या पर्यटनदृष्ट्या विकासाची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. शासनाने येथे स्थायी मार्ग तयार करून माहिती फलक, विश्रांतीगृह, प्राथमिक उपचार व्यवस्था, टुरिस्ट गाईड आणि बायो-टॉयलेट्स यांची सोय करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा संपूर्ण भाग पर्यावरणपूरक व इको-टुरिझम संकल्पनेनुसार विकसित केल्यास स्थानिक रोजगाराला चालना मिळू शकते. जंगल विभाग, पर्यटन विकास महामंडळ आणि स्थानिक प्रशासन यांचं समन्वयाने काम झाल्यास हे ठिकाण सिरोंचा तालुक्याच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास येऊ शकतं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज सोशल मीडियाच्या जोरावर अठू-बोदरी धबधब्याचं सौंदर्य जगासमोर उलगडत आहे, मात्र उद्या त्याचं व्यवस्थापन न केल्यास पर्यावरणीय नुकसान आणि अराजकता वाढू शकते. त्यामुळे शासनाने या नैसर्गिक वारशाकडे केवळ एक पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर जंगल-संवर्धन आणि आदिवासी सांस्कृतिक जतनाच्या दृष्टीनेही पाहण्याची गरज आहे.

Comments are closed.