Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बँक ऑफ इंडिया शाखेचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते उद्घाटन..

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया बँकांच्या कार्यक्षमतेवर उभा आहे. कर्जपुरवठा हा केवळ आर्थिक व्यवहार नसून ग्रामीण प्रगतीचा कणा आहे. म्हणूनच प्रत्येक पात्र लाभार्थ्याला गृहकर्ज, शिक्षणकर्ज, कृषी वा उद्योगाशी संबंधित योजनांचा लाभ सहज आणि सुलभपणे मिळायला हवा,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे बँक ऑफ इंडियाच्या नव्या शाखेचे — जिल्ह्यातील १४ व्या शाखेचे — उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्य महाप्रबंधक प्रमोद कुमार त्रिवेदी (पुणे), जिल्हा अग्रणी बँक अधिकारी प्रशांत धोंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हाधिकारी पंडा म्हणाले, “बँकांनी एकसमान कागदपत्र प्रणाली विकसित करून कर्जमंजुरीची प्रक्रिया जलद करावी. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व स्थानिक उद्योगांना चालना देणे हे आजच्या काळातील सर्वांत मोठे आव्हान आहे, आणि त्याचे उत्तर बँकांच्या सक्रिय सहभागात आहे.

उद्योगविकासाच्या नव्या वाटा — युवकांसाठी संधी…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात अनेक मोठ्या औद्योगिक गुंतवणुकींचे दरवाजे उघडत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, येथील नैसर्गिक संपत्ती, खनिजसंपदा आणि कृषीपूरक साधने हे उद्योगविकासाचे मजबूत स्तंभ आहेत. बँकांनी लघु-मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देत स्थानिक युवकांना उद्यमशीलतेकडे वळवावे.”

त्यांनी पुढे जनधन खाते उघडणे, जीवनज्योत व सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना आणि निष्क्रिय खात्यांचे पुनरुज्जीवन याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन बँकांना केले. तसेच आरबीआयच्या निष्क्रिय खात्यांतील रक्कम परत मिळविण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्याची सूचनाही दिली.

आष्टी शाखा ग्रामीण विकासाचा नवा अध्याय — त्रिवेदी…

मुख्य महाप्रबंधक प्रमोद कुमार त्रिवेदी यांनी सांगितले, “आष्टी शाखा ही गडचिरोली जिल्ह्याच्या बँकिंग सेवेचा मानाचा तुरा ठरेल. आसपासच्या तीस गावातील नागरिकांनी कृषी, उद्योग, शिक्षण आणि गृहविकासासाठी बँकेच्या योजनांचा लाभ घ्यावा. बँक ऑफ इंडिया ही सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी वचनबद्ध असून ग्रामीण व शेतकरी वर्गाला कमी व्याजदरात कर्ज सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी जयनारायण (आंचलिक प्रबंधक, नागपूर) यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी ज्ञानरंजन दास, आष्टी परिसरातील विविध बँकांचे अधिकारी, ग्रामस्थ व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.