Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शासनाच्या फ्लॅगशीप योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी बँकांची भूमिका महत्त्वाची – केंद्रीय अवर सचिव गोपी नाथ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली: शासनाच्या विविध फ्लॅगशीप योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील नागरिकांना या योजनांचा लाभ देऊन त्यांना रोजगारक्षम व आत्मनिर्भर करण्याचे आवाहन भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाचे अवर सचिव श्री. गोपी नाथ यांनी केले.

गडचिरोली येथे आज आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचा आढावा घेताना त्यांनी हे मत व्यक्त केले. या बैठकीस जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक जय नारायण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, तसेच वरिष्ठ बँक अधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोलीने आदर्श ठरावे

देशातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांना विकसित करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करत आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्याने आदर्श ठरावे आणि उत्कृष्ट कामगिरी करावी, असे आवाहन श्री. गोपी नाथ यांनी केले. तसेच, आधार सिडींगवर विशेष लक्ष केंद्रित करून शासनाने दिलेले उद्दिष्ट तातडीने पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रस्ताव लहान-लहान कारणासाठी परत पाठवू नये व त्यांना हेलपाटे बसणार नाही याची दक्षता बाळगण्याचे सांगितले. तर जय नारायण यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना अधिकाधिक बँकिंग सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी सर्व बॅंकांनी जास्तीत जास्त शाखा सुरू करण्याचे सांगितले.
यावेळी चालू खाते आणि बचत खाते (CASA), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), मुद्रा योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनांचा आढावा घेण्यात आला व त्या अंतर्गत दिलेले उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत ढोंगले यांनी जिल्ह्यातील बँकिंग सुविधांचा आढावा घेऊन विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती दिली. बँक प्रतिनिधी आणि विभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.