कोंबड्यांच्या झुंजीवर पैज; तब्बल 4.86 लाखांचा ऐवज जप्त,अहेरी पोलिसांची धाडसी कारवाई
अवैध कोंबडा बाजार, जुगार आणि त्यामागचा काळाबाजार यावर पोलिसांची धडक कारवाई कायम सुरू राहील. कायदा मोडणाऱ्यांना कुठेही पळता येणार नाही,असा ठाम इशारा पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांनी दिला....
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोंबड्यांच्या निर्दयी झुंजींवर पैज लावून गावोगावी फोफावलेल्या अवैध जुगार – धंद्याला अखेर पोलिसांनी जबर धक्का दिला आहे. अहेरी पोलिसांनी शनिवारी टेकुलगुडा आणि तलवाडा या दोन गावांवर सलग धाड टाकत तब्बल 4 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत 19 आरोपींना अटक करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुपारच्या सुमारास टेकुलगुडा येथे आरोपी पांढऱ्या कोंबड्यांच्या पायाला धारदार कात्या बांधून झुंजी लावत, पैशांची बाजी लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ धाड टाकत तीन पांढरे कोंबडे, कात्या, दोरी, पट्ट्या यांसह हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, एचएफ डिलक्स अशा पाच दुचाकी जप्त करण्यात आले. यावेळी आरोपी रंगेहात पकडले गेले आणि 2 लाख 42 हजारांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला.
तर दुसरीकडे त्याच दिवशी सायंकाळी पोलिसांनी तलवाडा गावातही छापा टाकला. येथे 9 आरोपींच्या अंगझडतीतून 6150 रुपयांची रोकड, सहा जिवंत कोंबडे, सहा धारदार कात्या तसेच चार दुचाकी जप्त करण्यात आले असून एकूण 2 लाख 43 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात अहेरी पोलिसांना यश आले आहे.
या दोन कारवाईत जप्त केलेला एकूण मुद्देमाल 4 लाख 86 हजार 650 रुपयांचा असून, आरोपींवर कठोर कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक, निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक हर्षल व्ही. ऐकरे यांनी केले, तर तलवाडा कारवाईचा तपास सहायक पोलीस निरीक्षक डी.सी. पटले करीत आहेत.
जिल्हाभरात खेड्यापाड्यांमध्ये कोंबड्यांच्या झुंजी ही फक्त प्राण्यांवरील अमानुष क्रूरता नसून, त्यामागे जुगाराचे भांडवल आणि गुन्हेगारी संस्कृतीची बीजे पेरली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गावकुसातून सुरू होणाऱ्या या धंद्यामुळे सामान्य कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने ही कारवाई महत्त्वाची समजली जात असून असेच सातत्य पोलिसांनी करीत रहावे .अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त करून अहेरी पोलिसांचे कौतुक करीत आहेत.
जुनोना जंगलात अस्वलाचा हल्ला; पिता-पुत्र गंभीर जखमी, वडिलांची प्रकृती चिंताजनक
Comments are closed.