Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ताडोबातील वनरक्षकासह दोघांविरूद्ध गुन्हा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

चंद्रपूर, दि. २ डिसेंबर : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव कोअर पर्यटन प्रवेशद्वारावर तैनात वनरक्षकासह दोघांविरोधात चिमूर पोलिसांनी आज २ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला. दलालांशी संगनमत करून हा वनरक्षक पर्यटकांकडून पैसे उकळून ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अवैध प्रवेश देत होता.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नवेगाव कोअर पर्यटन प्रवेशद्वारावरील वनरक्षक टेकचंद रूपचंद सोनुले व सचिन संतोष कोयचाडे यांचा समावेश आहे. वनरक्षक टेकचंद सोनुले हा सचिन कोयचाडे याच्या मदतीने पैसे घेऊन पर्यटकांना ताडोबाच्या कोअर क्षेत्रात सोडत असल्याची माहिती क्षेत्रसंचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार, वन विभागाच्या पथकाने ताडोबा प्रकल्पाच्या नवेगाव कोअर प्रवेशद्वारावर १ डिसेंबर रोजी छापा घातला. त्यावेळी सचिन कोयचाडेच्या जिप्सीने पर्यटकांना वनरक्षक सोनुले अनाधिकृपणे सोडत असल्याचे आढळून आले. त्याकरिता पर्यटकांना कोयचाडेच्या खात्यावर ९ हजार रुपये घेण्यात आले. त्यांनी वन कर्मचाऱ्यांच्या पथकाला पर्यटकांकटून पैसे घेऊन अनाधिकृतपणे ताडोबा प्रकल्पात प्रवेश देत असल्याची वनरक्षक सोनुलेने कबुली दिली.
वन विभागाच्या पथकाने सोनुलेला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यामध्ये सोनुले अनेक दिवसांपासून पैसे घेऊन कोयचाडेच्या जिप्सीने पर्यटकांना अवैध प्रवेश देत असल्याचे आढळून आले. त्यानंतर वनरक्षक सोनुले व कायचाडेविरोधात चिमूर पोलीस ठाण्यात आज २ डिसेंबर रोजी लेखी तक्रार दाखल करण्यात आली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटन आरक्षण करून देण्याकरिता कोणत्याही एजंटची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना पर्यटकांनी बळी पडू नये, असे आवाहन प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. रामगावकर यांनी केले आहे. या कारवाईमध्ये सहायक वनसंरक्षक महेश खोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) सतीश शेंडे व इतरांनी कामगिरी बजावली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.