Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मविआच्या बैठकीत लोकसभा व विधानसभेच्या जागा वाटपावर सविस्तर चर्चा – अजित पवार

अकोला प्रकरणात क्लीप कुणी व्हायरल केली, यामागे मास्टरमाईंड कोण होता, त्याचा उद्देश काय होता, यासर्व खोलात सरकारने तातडीने गेले पाहिजे...

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 15 मे –लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप करुन कोणत्या व कुणी लढवाव्यात यावर सविस्तर चर्चा महाविकास आघाडीच्या बैठकीत झाल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

दरम्यान लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका होतील.एकदा निवडणूका लागल्यावर धावपळ व्हायला नको म्हणून त्याबद्दलही चर्चा बैठकीत झाल्याचे अजित पवार म्हणाले. कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर आदरणीय शरद पवारसाहेबांनी उध्दव ठाकरे, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार रविवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीतील चर्चेची माहिती जयंत पाटील, संजय राऊत, नाना पटोले यांनी माध्यमांना दिलीच आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

२०१४ पासून कालच्या कर्नाटकाच्या निकालापर्यंत काही राज्यांचा अपवाद वगळता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात दोनवेळा सरकार आणि वेगवेगळ्या राज्यात सरकारे आली त्यामुळे भाजपमध्ये उत्साह पहायला मिळायचा. मात्र यामुळे विरोधक नाऊमेद झाले होते. १३ मे रोजी कर्नाटकचा निकाल आला आणि एक्झिट पोलचे अंदाजही चुकले. कॉंग्रेसने १३५ पर्यंत मजल मारली त्यामुळे विरोधकांचा उत्साह द्विगुणित झालेला पहायला मिळाला. पुढची लाईन अॉफ एक्शन महाविकास आघाडीची महाराष्ट्रात काय असली पाहिजे आणि कशापद्धतीने राहिलेली वज्रमूठ सभा झाली पाहिजे यावर चर्चा झाली. याशिवाय मागच्या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करुन निवडणूका लढवल्या होत्या. यावेळी महाविकास आघाडी करुन निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला असेही अजित पवार यांनी सांगितले.

निवडणूकांतील जागा वाटप म्हटल्यावर तिन्ही पक्ष नावे देणार आहेत. त्यातून बैठक होईल. त्यासाठी तिन्ही पक्षातील दोघेजण अशी सहा जणांची समिती स्थापन करून पुढच्या लोकसभेच्या ४८ जागा व विधानसभेच्या २८८ जागांचे वाटप कसे करायचे. याशिवाय फक्त तीनच पक्ष नाही तर या तिन्ही पक्षांशी संबंधित मित्रपक्ष आहेत. त्यांनाही जागावाटपात बरोबर घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर आहेत त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे आज शिवसेनेच्या सदस्यांनी अर्ज दाखल केला. अध्यक्ष आल्यावर त्यांना उपाध्यक्ष माहिती देतील आणि विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय देतील अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अकोला येथील घटनेत सोशल मिडियामध्ये काही क्लीप व्हायरल झाल्या. त्यामध्ये काही समाजाच्या भावना दुखावणारी घटना होती. त्यातून एक ग्रुप आक्रमक झाला. त्यानंतर ही घटना घडली आहे. वास्तविक राज्यसरकारने या गोष्टींना आवर घातला पाहिजे. कुणी क्लीप व्हायरल केली याची शहानिशा केली पाहिजे. अलीकडे सायबर गुन्हे वाढले आहेत. अशावेळी तपास यंत्रणांच्या हातात खूप काही बाबी असतात. ही क्लीप कुणी व्हायरल केली, यामागे मास्टरमाईंड कोण होता, त्याचा उद्देश काय होता, यासर्व खोलात तातडीने गेले पाहिजे. हे एका ठिकाणी झाले उद्या ते दुसरीकडे होऊ शकते. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम राज्य सरकारच्या हातात असणाऱ्या पोलीस यंत्रणेकडे असते. पोलिस यंत्रणेत राजकीय हस्तक्षेप न होता अशा प्रकारच्या चौकशा पूर्ण करण्यासाठी मुभा दिली तर पोलीस यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करू शकते. हा पाठीमागचा अनुभव आहे असेही अजित पवार म्हणाले.

हे पण वाचा :-

Comments are closed.