जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून स्थानिकांना दिले पट्टे ..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नुकत्याच मुलचेरा तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या शेती बांधावर प्रत्यक्ष भेट देत पिकांचे नुकसान, पाणीस्थिती आणि कृषी हानीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, पिकांची सध्याची स्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर माहिती घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे पूर्ण करून शासनास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या तसेच मदत व पुनर्वसन उपाययोजनांबाबत समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले.या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम. आणि तहसिलदार चेतन पाटील उपस्थित होते. सेवा पंधरवड्या अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ या अभियानात जिल्हाधिकारी पंडा यांनी सन २०११ पूर्वीच्या शासकीय जमिनीवरील घरांना नियमित करण्याच्या प्रक्रियेत मुलचेरा तालुक्यातील निवडक दहा लाभार्थ्यांना अतिक्रमण नियमनाखाली पट्टे वितरित केले. तालुक्यात एकूण सत्तेचाळीस लाभार्थ्यांना निवासी पट्टे मंजूर झाल्याची माहिती तहसिलदार पाटील यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दौऱ्यात तालुक्यातील विकासकामांची सखोल पाहणी करत महसूल आणि सेवा पंधरवडा उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यांनी मंडळ अधिकारी, तलाठी आणि कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेऊन विविध कामांच्या गतीचा आढावा घेतला. याशिवाय जिल्हाधिकारी पंडा यांनी शासकीय आश्रम शाळा, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद शाळा विवेकानंदपूर तसेच एकलव्य मॉडेल स्कूलला भेट देऊन पाहणी केली आणि शिक्षण, आरोग्य व अधोसंरचना विषयक आवश्यक सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. दौऱ्यातील त्यांच्या या प्रत्यक्ष पाहणीमुळे प्रशासन अधिक उत्तरदायी आणि परिणामकारक कार्यपद्धतीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून आले.