राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरीच्या वनस्पति शास्त्र विभागाची जीवाश्म उद्यान वडधम आणि काळेश्वरम ,मेडीगड्डा बॅरेजला शैक्षणिक सहल
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी: स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयअहेरी, येथील वनस्पति शास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी जीवाश्म उद्यान, वढधम आणि काळेश्वरम, मेडीगड्डा बॅरेज येथे शैक्षणिक सहल दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली. या सहलीत महाविद्यालयातील विभागातील 50 विद्यार्थ्यांनी सुमारे २५० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या पर्मियन कालखंडातील जीवाश्मांचे निरीक्षण केले.
या जीवाश्मांमध्ये विशेषतः जिम्नोस्पर्म वनस्पतींचे जीवाश्म आढळून आले. यातील दोन प्रमुख पेट्रीफाइड (शिलारूप) जीवाश्म ओळखण्यात आले आहेत—Araucarioxylon आणि Cupressinoxylon या जिम्नोस्पर्म लाकडी जीवाश्मांचा अभ्यास करण्यात आला. यासोबतच, नव्याने उभारण्यात आलेल्या संग्रहालयात (म्युझियम) विद्यार्थ्यांना डायनोसॉरचे जीवाश्म, मास्यांचे इंप्रेशन (छाप) आणि गवताच्या जीवाश्मांच्या छापांचे नमुने पाहण्याची संधी मिळाली.
सिरोंचा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी जीवाश्म निर्मिती प्रक्रिया, जिम्नोस्पर्म जीवाश्मांचे महत्त्व, त्यांचे संशोधन आणि भविष्यातील उपयोग याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. तसेच, काही जीवाश्मांचे अद्याप ओळख पटविण्याचे व त्यांच्यावर संशोधन करण्याचे कार्य सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यानंतर विद्यार्थ्यांनी काळेश्वरम प्रकल्पातील मेडीगड्डा बॅरेजला भेट दिली. या बॅरेजचे जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि सिंचनातील महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या प्रकल्पाच्या मदतीने परिसरातील शेतीला कसा फायदा होत आहे आणि जलसंपत्तीचे नियोजन कसे केले जाते, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
ही शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक आणि संशोधनात्मक ठरली, कारण त्यांना जिम्नोस्पर्म जीवाश्मांचा प्रत्यक्ष अभ्यास तसेच जलसंधारण आणि सिंचन व्यवस्थापनाबाबत माहिती मिळाली, ज्याचा भविष्यात उपयोग होऊ शकतो.
या सहलीचे आयोजन प्राचार्य डॉ. मंडल सर यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पती शास्त्राचे विभाग प्रमुख प्रा.रमेश हलामी यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. यात डॉ. पाल मॅडम, प्रा. हलामी सर, प्रा. मोरे सर, प्रा. खोब्रागडे सर, प्रा. बिस्वास सर, प्रा. गोंड सर, डॉ. राठोड सर, प्रा. वानकर सर, प्रा. कंचन धुर्वे मॅडम आणि प्रा. आदेश मंचालवार यांनी सहभाग घेतला व विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
Comments are closed.