Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर – माजी आ. सुधीर पारवे

– सुधीर पारवे यांची पत्रकार परिषदेत माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, 9 जानेवारी: अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये 59 हजार कोटी रुपयाची भरीव वाढ केल्यामुळे आता या विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग खर्‍या अर्थाने सुकर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सामाजिक कल्याण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने आता कोणत्याच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नसल्याची माहिती उमरेडचे माजी आमदार, पंचायतराज समितीचे माजी अध्यक्ष सुधीर पारवे यांनी दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्थानिक धंतोली येथील भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह कार्यालयात आज 9 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, नगराध्यक्ष अतुल तराळे, अशोक विजयकर, प्रमोद राऊत, देवानंद डोळस, मनोज तरारे, फकीरा खडसे, योगेंद्र मतळे आदी उपस्थित होते.

सुधीर पारवे पुढे म्हणाले, आतापर्यंत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या ’पीएमएस-एससी’ या योजनेंतर्गत उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही पुरेशी नव्हती तसेच या शिष्यवृत्तीच्या वितरणातही भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या. केंद्रीय मंत्रिमंडळाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीचे वाटप पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता, आधार ओळखपत्र, जातीचे प्रमाणपत्र व बँकेचे तपशील पडताळून ऑनलाईन (डीबीटी) पद्धतीने निधीचे वितरण करण्यात येणार आहे. सन 2017 ते 2020 या कालावधीत अनुसूचित जाती वर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीकरिता दरवर्षी 1100 कोटी रुपये निधी दिला जात होता. आता आगामी पाच वर्षात दरवर्षी हा निधी 6 हजार कोटी रुपये करण्यात आला आहे. या निधीतील केंद्र सरकारचा 60 टक्के तर राज्य सरकारचा 40 टक्के वाटा आहे. ’पीएमएस-एससी’ या योजनेच्या निधीत यापूर्वीच अशी वाढ करणे अपेक्षीत होते. मात्र, यापूर्वीच्या काँग्रेस प्रणित युपीए सरकारने केवळ राजकारणासाठीच डॉ. आंबेडकर, फुले- शाहू महाराजांच्या नावाचा वापर केला. अनुसूचित जाती वर्गातील लोकांच्या खर्‍या अडचणी समजून घेऊन ते सोडवण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न केले नसल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या निधीत वाढ करुन विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मार्ग खुला केला आहे. दहावीनंतर पैशाअभावी ज्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.