ट्रॅक्टर सोडवण्यासाठी १० हजार घेताना क्षेत्र सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
राजाराम (खां) उपक्षेत्रात एसीबीची कारवाई; सिरोंचा वनविभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वनजमिनीवरील कारवाईचा धाक दाखवून आर्थिक तडजोडीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. ट्रॅक्टर जप्ती प्रकरणात दंड कमी करून देण्याच्या नावाखाली १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिरोंचा वनविभागातील क्षेत्र सहाय्यकाला एसीबीच्या गडचिरोली पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (२१ जानेवारी) कमलापुर वनपरिक्षेत्रातील राजाराम (खां) उपक्षेत्रात करण्यात आली.
महेश जयंतराव धामनगे (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या क्षेत्र सहाय्यकाचे नाव असून, त्याच्याविरोधात राजाराम (खां) उपपोस्ट येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हा तेलंगणा राज्यातील असून, तो आपल्या काकांच्या ट्रॅक्टरने शेतकऱ्यांच्या शेतात मशागत करत असताना दोन वनरक्षकांनी ‘वनजमिनीवर अवैध काम’ असा आरोप करत ट्रॅक्टर जप्त केला. त्यानंतर धामनगे यांनी गुन्हा दाखल न करता प्रकरण कमी दंडात मिटवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली.
या मागणीची एसीबीकडून पडताळणी करण्यात आली असता १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना धामनगे याला सापळ्यात अडकवण्यात आले. नक्षलप्रभावित व संवेदनशील भागात झालेल्या या कारवाईनंतर आरोपीच्या राजाराम (खां) व चंद्रपूर येथील निवासस्थानांची झडती घेण्यात आली.
ही कारवाई एसीबी नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा दलालाने लाच मागितल्यास नागरिकांनी तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत सगणे यांनी केले आहे.

