Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डेंग्यूचा पाचवा बळी, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर पण दुर्गम भागातील स्थितीचे भयावह दर्शन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्ह्यातील मुलचेरा तालुका सध्या डेंग्यूच्या विळख्यात सापडला आहे. काकरगट्टा येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याने पाचवा बळी नोंदला गेला आहे. गावोगावी पसरणाऱ्या या साथीनं केवळ आरोग्य यंत्रणाच नव्हे, तर ग्रामस्थांच्याही मनात भीतीचे सावट दाटून आले आहे. प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना राबवत असले तरी या प्रसंगाने दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेतील कमकुवत बाजू उघड केल्या आहेत.

मुलचेराच्या लगाम, काकरगट्टा, येल्ला या गावांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांसोबत संवाद साधत त्यांनी डेंग्यूची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. धूरफवारणी व कीटकनाशक फवारणी सारख्या यंत्रणांनी गावे व्यापली असली तरी ग्रामस्थांच्या मनात प्रश्न अनुत्तरित आहेत — “आजार वाढला तर उपचार कुठे मिळणार? रुग्णालयापर्यंत पोहोचायचं कसं? रक्त चाचणीसाठी रुग्ण दूरवर नेला तर वेळेत उपचार मिळणार का?”

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरोग्य विभागाने आजवर १३ गावांमध्ये कीटकनाशकाची फवारणी केली असून ५ गावांत धूरफवारणी पूर्ण झाली आहे. तब्बल ६९० तपासण्या, १४४ रक्तनमुने, २९३ RDK चाचण्या पार पडल्या असून, यामध्ये ११८ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. यातील २८ जण सध्या उपचाराखाली आहेत. या आकडेवारीतून साथीचे गांभीर्य अधोरेखित होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान, गावोगावी पथके तैनात करण्यात आली आहेत. रुग्णवाहीका, औषधे, तातडीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, डोंगरदऱ्यांत वसलेल्या गावे, दळणवळणाची कमतरता, रस्त्यांची बिकट अवस्था आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील अपुरी सुविधा या सर्वांनी परिस्थिती अधिकच जटिल केली आहे. अशा वेळी धूरफवारणी आणि तपासण्या या अल्पकालीन उपायांबरोबरच आरोग्य संरचनेच्या मूळ प्रश्नांवर तोडगा काढण्याची गरज प्रकर्षाने पुढे आली आहे.

गावकऱ्यांचे आवाहन व आरोग्य विभागाचा सल्ला डॉ. शिंदे यांनी ग्रामस्थांना घराच्या परिसरात पाणी साचू न देण्याचे, टायर, नारळाच्या करवंट्या, ड्रम, पाणी साठवणारी भांडी यांची नियमित साफसफाई करण्याचे आवाहन केले. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असेही ते म्हणाले. येल्ला आणि काकरगट्टा येथे विशेष आरोग्य पथके तैनात करून सतत देखरेख सुरू आहे.

तथापि, डेंग्यूच्या साथीने ग्रामस्थांना दिलेला धडा अधिक गंभीर आहे — की आरोग्य यंत्रणा दुर्गम गडचिरोलीत अजूनही जीवावर खेळत पोहोचते, पण कायमस्वरूपी पायाभूत आरोग्य सुविधा नसल्याने जनता असुरक्षित राहते.

आज पाचवा बळी गेला आहे; उद्या आणखी जीव धोक्यात पडू नयेत यासाठी केवळ तात्पुरती फवारणी नव्हे, तर रुग्णालये, तपासणी केंद्रे, प्रशिक्षित डॉक्टर व कर्मचारी, औषधसाठा यांची उपलब्धता गावांच्या दारापर्यंत पोहोचवणे हाच खरी उपाययोजना आहे.

Comments are closed.