धक्कादायक बातमी: टीव्हीवरील चॅनेल पाहण्यासाठी रिमोटवरून भांडण; १० वर्षीय बालिकेची आत्महत्या
तीन वर्षांपूर्वी वडिलांनी केली होती आत्महत्या; बोडेना गावातील हृदयद्रावक घटना
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची, ता.२२ : कोरची तालुक्यातील बोडेना गावात एका चिमुरडीने केवळ टीव्हीवरील चॅनेल पाहण्याच्या वादातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सोनाली आनंद नरोटे (वय १०) असे मृत बालिकेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोनाली ही आपल्या बहिणी संध्यासोबत टीव्ही पाहत होती. चॅनेलवरून दोघींमध्ये रिमोटसाठी वाद झाला. रिमोट मोठ्या बहिणीच्या हातात गेल्याने नाराज झालेली सोनाली घराच्या मागे गेली आणि तिने पेरूच्या (अमरूदाच्या) झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच कोरची पोलीस ठाण्याचे निरीक्षक शैलेश ठाकरे, उपनिरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर राहुल राऊत यांनी मृत्यूची नोंद केली.
विशेष म्हणजे, सोनालीच्या वडिलांनीही तीन वर्षांपूर्वी फास लावून आत्महत्या केली होती. त्या वेळी सोनालीनेच वडिलांना झुलताना पाहिले होते. त्या घटनेचा तिच्या मानसिकतेवर खोल परिणाम झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
सोनाली आणि तिची बहिण संध्या व भाऊ सौरभ हे गोंदिया जिल्ह्यातील कोकना खोबा येथील खासगी आश्रमशाळेत शिकत होते. सुट्टीसाठी ते सध्या गावी आले होते. आई मंगला व धाकटा भाऊ शिवम घरी राहत होते.
या प्रकरणामुळे लहान मुलांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचे भीषण परिणाम समोर आले आहेत. पालकांनी आणि समाजाने मुलांशी अधिक संवाद साधण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
Comments are closed.