२०.७० लाखांचा अवैध दारू साठा व चारचाकी वाहन जप्त
दारूबंदी जिल्ह्यात पोलिसांची निर्णायक कारवाई; आरोपी ताब्यात, इतरांचा शोध सुरु
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २२ मे : दारूबंदी लागू असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी अवैध देशी दारूच्या साठ्यावर मोठी धाड घालत तब्बल २० लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्यांबरोबरच एक चारचाकी वाहनही हस्तगत करण्यात आले आहे. एक आरोपी अटकेत असून इतर तिघा फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
ही कारवाई २१ मे २०२५ रोजी सिरोंचा उपविभाग अंतर्गत झिंगानूर परिसरात पार पडली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही माहितीवर आधारित धाड टाकली.
दारूचा साठा घरातच लपवलेला…
पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कारे कोरके गावडे (३८), रा. झिंगानूर याच्या घरी अवैधरित्या देशी दारूचा मोठा साठा ठेवण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी पंचासमक्ष त्याच्या घराची झडती घेतली असता, १२,४०० नग ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या देशी दारूच्या बाटल्या सापडल्या. प्रत्येक बॉक्समध्ये १०० बाटल्या आणि एका बॉक्सची किंमत १०,००० रुपये असल्याने एकूण १२,४०,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
संपूर्ण टोळीचा पर्दाफाश…
याबाबत अधिक चौकशी केली असता, गावडे याने समया बापू दुर्गम आणि सडवली बापू दुर्गम (दोघेही ३२ वर्षांचे) या व्यक्तींनी देखील अशाच प्रकारे देशी दारू साठवून ठेवली आहे, असे सांगितले. पोलीस पथकाने त्यांच्यावर कारवाईसाठी झिंगानूरमध्येच त्यांच्या घरी धाड टाकली. मात्र पोलिसांचा सुगावा लागताच दोघेही आरोपी घटनेस्थळावरून फरार झाले.
बोलेरोतून दारू वाहतूक..
या ठिकाणी एक महिंद्रा बोलेरो (क्र. एपी-१५-एम-१०८८) वाहन आढळून आले. त्याची तपासणी केली असता त्यात ४,८०० नग बाटल्या (किंमत : ४,८०,००० रुपये) आढळून आल्या. शिवाय सदर वाहनाची अंदाजे किंमत ३,५०,००० रुपये आहे. अशा प्रकारे या ठिकाणावरून एकूण ८,३०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पुरवठादार देखील ओळख पटली..
तपासाअंती रुपेश कांरेगला (३२), रा. देचलीपेटा, ता. अहेरी हा देशी दारूचा पुरवठादार असल्याचे उघड झाले. या प्रकरणी चारही आरोपींविरुद्ध कलम ६५(ई), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारे गावडे याला अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
कारवाईत पोलिसांचा समन्वय आणि तडफ..
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अहेरी विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक, तसेच सिरोंचा उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या धाडीत पोउपनि. अभिजीत घोरपडे (उपपोस्टे झिंगानूर), तसेच बामणी आणि सिरोंचा येथील विविध पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता.
Comments are closed.