गडचिरोलीच्या सांस्कृतिक वाटचालीत ऐतिहासिक टप्पा – ‘मोबाईल मॉडेल थिएटर’चे उद्घाटन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २२ मे : गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि दुर्गम मानल्या जाणाऱ्या भागात आज इतिहास घडला. राज्यातील नगरपालिका क्षेत्रात प्रथमच वातानुकूलित आणि तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक अशा ‘मोबाईल सिनेमा थिएटर’चे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या उपक्रमामुळे केवळ गडचिरोली नव्हे, तर संपूर्ण विदर्भात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
विकसनाच्या दिशेने सशक्त पाऊल..
गडचिरोली जिल्ह्याचा विकास केवळ रस्ते, पाणी आणि वीजपुरवठ्यापुरता मर्यादित न ठेवता, आता सांस्कृतिक आणि सामाजिक घडामोडींसाठीदेखील झपाट्याने काम सुरू झाले आहे. जिल्हा नियोजन विकास निधीतून तब्बल ५० लाख रुपयांची तरतूद करून नगर परिषदेमार्फत हे सिनेमा थिएटर उभारण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, “ही सुविधा गडचिरोली शहरासाठी केवळ एक मनोरंजन केंद्र न राहता, सामाजिक सलोखा आणि प्रबोधनाचे माध्यम ठरणार आहे.”
विकासाला दिशा देणारा उपक्रम ..
हे थिएटर सध्या विशेष प्रकारच्या हवेने फुगवलेल्या वातानुकूलित तंबूत कार्यरत आहे. एकाच वेळी १२० प्रेक्षक बसू शकतील, असे नियोजन असून दररोज चार चित्रपट सत्रे चालवली जाणार आहेत. लवकरच येथे फूड कोर्ट, किड्स झोन आणि इतर सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
संस्कृतीचा नवा अध्याय :
“हे केवळ चित्रपटगृह नसून, गडचिरोलीसारख्या भागासाठी सांस्कृतिक परिवर्तनाचे केंद्र असेल,” असे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी आपल्या भाषणात नमूद केले. “येथे केवळ करमणूकप्रधान नव्हे, तर सामाजिक भान निर्माण करणारे चित्रपटही दाखवले जातील. त्यामुळे युवा पिढीमध्ये जाणिवा जागृत होतील आणि समाजात सकारात्मकता रुजेल,” असे ते म्हणाले.
स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ..
नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी यासाठी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दिलेले सहकार्य मोलाचे असल्याचे सांगितले. “हे थिएटर अल्पावधीत उभे राहिले, यामागे प्रशासनाची चिकाटी आणि स्थानिक नागरिकांचा पाठिंबा कारणीभूत आहे,” असे ते म्हणाले.
सांस्कृतिक वळणाचे सकारात्मक संकेत
गडचिरोलीसारख्या भागात अनेक वर्षांपासून अशा सुविधा नसल्यामुळे नागरिकांना चित्रपट पाहण्यासाठी दीर्घ अंतर प्रवास करावा लागत असे. आता या सिनेमा थिएटरच्या माध्यमातून शहर व परिसरातील लोकांना घराजवळच दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील तरुणांसाठी हे ठिकाण केवळ मनोरंजनाचे नव्हे, तर समाजप्रबोधनाचेही माध्यम ठरण्याची शक्यता आहे.
कार्यक्रमाचे संचालन आनंद खुने यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन गणेश ठाकरे यांनी केले.
Comments are closed.