Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अग्रेसर

४८५ नवउद्योजकांना मंजुरी, १०० टक्के उद्दिष्टपूर्ती

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत १०० टक्के उद्दिष्टपूर्ती साधली आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली असून, जिल्ह्यातील ४८५ नवउद्योजकांचे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवउद्योजकांना वित्तपुरवठा करण्यात आला असून, त्यांना अनुदान (सबसिडी) देखील मिळवून देण्यात जिल्हा अग्रेसर ठरला आहे. विविध बँकांनी या योजनेसाठी सक्रिय सहभाग नोंदवला असून, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रत्येकी १२९ प्रकरणे, बँक ऑफ इंडियाने ८६, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ६४ आणि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५२ प्रकरणांना मंजुरी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हाधिकारी पंडा यांनी नियमितपणे बैठका घेऊन योजनेची प्रगती तपासली. बँकांनी देखील त्यांना दिलेल्या उद्दिष्टांचे वेळेत पालन करत सहकार्य केले. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांचे अभिनंदन करत, आगामी काळातही अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासह केंद्र शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठीही जिल्ह्यातील बँकांचा सकारात्मक दृष्टिकोन असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी उद्योग उभारणीसाठी अनुदान व आर्थिक सहाय्य पुरवते. त्यामुळे या योजनांचा लाभ अधिकाधिक बेरोजगारांनी घ्यावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक व बाहेरील उद्योजकांसाठी गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण झाले असून, बँकांकडून उद्योगांसाठी आवश्यक असलेली पतनिर्मिती तत्परतेने करण्यात येत असल्याचे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक  प्रशांत धोंगडे यांनी सांगितले.

या यशस्वी अंमलबजावणीसाठी अग्रणी बँक व्यवस्थापक, सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक, शाखा व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी-कर्मचारी, खादी ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी मेश्राम व कर्मचारी, जिल्हा परिषदेची उमेद (MSRLM), माविम, तसेच मिटकॉन आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) या प्रशिक्षण संस्थांनी मोलाची भूमिका बजावली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.