गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ संपन्न
“अर्थप्राप्तीसाठी नव्हे, तर अर्थपूर्ण जगण्यासाठी शिक्षण हवे” – डॉ. अभय बंग...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली सारख्या वनवैभवाने नटलेल्या परिसरात उभे राहिलेले गोंडवाना विद्यापीठ हे केवळ शैक्षणिक संस्था नसून एक नव तपोवन आहे. या तपोवनातून समाजाशी नाते जोडणारे, परिवर्तन घडवणारे उपक्रम आकार घेत असून ते स्थानिक समाजजीवनाला नवी दिशा देत आहेत, असे प्रतिपादन SEARCH (चातगाव) संस्थेचे संस्थापक, महाराष्ट्र भूषण व पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाचा तेरावा दीक्षांत समारंभ आज विद्यापीठाच्या नव्या सांस्कृतिक सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. बंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गोंडी व माडिया भाषांचे संवर्धन, बांबू संशोधन, ‘एकल’, ‘विद्यापीठ आपल्या गावात’ यांसारख्या उपक्रमांमधून विद्यापीठाने कौशल्याधारित शिक्षणाची भक्कम पायाभरणी केली असून, त्यातून रोजगारनिर्मिती व सामाजिक स्तर उंचावण्यास हातभार लागत आहे, असे ते म्हणाले. विद्यापीठ केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर समाजमन घडवण्याचे कार्य करते. त्यामुळे शिक्षणातून केवळ रोजगारक्षम व्यक्तिमत्त्व नव्हे, तर जीवन जगण्याचे संस्कार घडले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला.
आजची युवा पिढी ही भारताचे भवितव्य घडविण्याची खरी ताकद आहे. सामाजिक प्रश्नांना आजीविकेची संधी मानून, नोकरीच्या मागे न धावता स्वतः रोजगारनिर्मितीक्षम व्हावे, असे आवाहन करताना डॉ. बंग म्हणाले की, नव्या जगाचे आकलन करताना कला, सृजनशीलता आणि सहृदयता अंगी बाणवून केवळ अर्थप्राप्तीसाठी नव्हे, तर अर्थपूर्ण जगणे शिकले पाहिजे.
या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या इतिहासातील हे दीक्षांत समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सोहळा प्रथमच विद्यापीठाच्या स्वतःच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडला. ‘एकल’, ‘विद्यापीठ आपल्या गावात’, ‘स्पार्क’, ‘गोसेखुर्द प्रकल्प’, ‘वीर बाबूराव शेडमाके योजना’, ‘स्कूल कनेक्ट’ आणि विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था हे सर्व उपक्रम यशस्वीपणे कार्यरत असून त्यामागे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे, असे त्यांनी नमूद केले. अडपल्ली येथील १७० एकर जागेवर विद्यापीठाचा देखणा परिसर लवकरच साकार होणार असून, हे विद्यापीठ विद्यार्थी व समाजाप्रती आपले उत्तरदायित्व देशपातळीवर सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या दीक्षांत समारंभात ९६ विद्यार्थ्यांना आचार्य (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली. त्यामध्ये मानव विज्ञान विद्याशाखा – ४३, विज्ञान व तंत्रज्ञान – ३४, वाणिज्य व व्यवस्थापन – १५ आणि आंतरविद्याशाखीय विद्याशाखा – ४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी ३९ सुवर्ण, १ रजत, १ इंद्रधनुष्य, १ अश्वमेध आणि १ आचार्य पदवी इतिहास, अशी एकूण ४३ पदके प्रदान करण्यात आली. विद्याशाखानिहाय सुवर्णपदकांमध्ये मानव विज्ञान – २३, विज्ञान व तंत्रज्ञान – ८, वाणिज्य व व्यवस्थापन – ५ आणि आंतरविद्याशाखीय – ३ सुवर्णपदकांचा समावेश आहे.
यंदा सुवर्णपदकांच्या शर्यतीत दोन विद्यार्थिनींनी विशेष ठसा उमटवला. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून नेवाजाबाई हितकरणी महाविद्यालय, ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) येथील वैष्णवी संजय थेरकर हिने तीन सुवर्णपदके पटकावली, तर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील जादा रबिया रियाज हिनेही तीन सुवर्णपदके मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
याशिवाय SPARC (Social Programme on Addiction in Rural Community) या समाजाभिमुख अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भौतिकशास्त्र विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक अपर्णा भाके आणि मराठी विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक सविता गोविंदवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले.
या समारंभास अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्यापरिषद सदस्य, दानदाते, विविध प्राधिकरणे व समित्यांचे सदस्य, संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments are closed.