गोंडवाना विद्यापीठाच्या मराठी विभागाचा ‘बोलींचा जागर’ उपक्रमात पुढाकार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १४ :
महाराष्ट्रातील विविध बोलीभाषांचे जतन, संवर्धन आणि दस्तावेजीकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘बोलींचा जागर’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमात गोंडवाना विद्यापीठाच्या मराठी विभागाने पुढाकार घेतला आहे.
“बोलीभाषा ही त्या त्या समाजाच्या इतिहासाची, सांस्कृतिक अस्मितेची आणि जीवनपद्धतीची वाहक आहे. बोलींना व त्या बोलणाऱ्या समाजाला प्रतिष्ठा मिळावी, बोलीतील साहित्य जिवंत राहावे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी शासनाने ‘बोलींचा जागर’ हा उपक्रम सुरू केला आहे,” असे प्रतिपादन अरुण गिते, संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी गोंडवाना विद्यापीठात आयोजित बैठकीत केले.
येत्या जानेवारी महिन्यात नागपूर येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून, त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक बोलींवर विद्यापीठांच्या माध्यमातून कार्यशाळा घेतल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध बोलींच्या अभ्यासासाठी बोली संशोधक व अभ्यासकांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, भाषा संचालनालयाचे संचालक अरुण गिते, भारत जाधव, डॉ. संजय पवार, मराठी विभागप्रमुख डॉ. सविता गोविंदवार यांच्यासह झाडीपट्टीच्या ज्येष्ठ कवयित्री अंजनाबाई खुणे, लेखक-दिग्दर्शक सदानंद बोरकर, साहित्यिक डॉ. श्याम मोहरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्र-कुलगुरू डॉ. कावळे यांनी “महाराष्ट्रातील ‘बोलींचा जागर’ची पहिली प्रत्यक्ष बैठक गोंडवाना विद्यापीठात होणे ही अभिमानाची बाब आहे. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठात झाडी, गोंडी व माडिया बोलींवर सातत्याने संशोधन सुरू असून स्वतंत्र झाडीबोली साहित्य दालनाची स्थापना करण्यात आली आहे,” असे सांगितले.
बैठकीत झाडी, गोंडी, माडिया, पोवारी, परधानी, हलबी, छत्तीसगडी, तेलगू आदी बोलींच्या जतन व संवर्धनाबाबत सविस्तर चर्चा झाली. बोलींचे लिखित दस्तावेज संकलन, प्रकाशन, लोककलांचे मंच, कलाकारांना प्रतिष्ठा व आर्थिक सहाय्य, बोलीभाषांसाठी स्वतंत्र अॅप निर्मिती, अभ्यासकांची नोंद व समन्वय समिती स्थापन करण्याबाबत सूचना मांडण्यात आल्या.
कवयित्री अंजनाबाई खुणे यांनी झाडीबोलीतील कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. लेखक सदानंद बोरकर यांनी लोककला महोत्सवांच्या आयोजनाची गरज अधोरेखित केली. भाषा अभ्यासक संतोष मेश्राम यांनी बोलीभाषा नष्ट होणे म्हणजे सांस्कृतिक अस्तित्वावर आघात असल्याचे नमूद केले.
बैठकीला चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतील झाडीपट्टी भागातून सुमारे ३० बोली अभ्यासक व साहित्यिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निळकंठ नरवाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. हेमराज निखाडे यांनी केले.
‘बोलींचा जागर’ उपक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीला बोलीभाषांकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाणार असून, बोलींच्या जतन व संवर्धनाच्या दृष्टीने ही बैठक दिशादर्शक ठरली आहे.

