Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

Get real time updates directly on you device, subscribe now.

प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत संत गाडगेबाबांच्या विचारांचं मोठं योगद – अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 23 फेब्रुवारी :- “संत गाडगेबाबा हे विज्ञानवादी विचारांचे कृतीशील संत, समाजसुधारक होते. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता, अनिष्ठ रुढी-परंपरांच्या निर्मुलनासाठी त्यांनी जीवनभर कार्य केलं. कुष्ठरुग्णांसह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची सेवा केली. स्वत: चिंध्या पांघरल्या. जाणीवपूर्वक गरीबीत जगले, मात्र, सर्वसामान्यांसाठी शाळा, धर्मशाळा, घाट, रुग्णालये, अनाथालये, अन्नछत्रांसारख्या सेवांची उभारणी केली. ‘मी कुणाचा गुरु नाही, माझा कुणी शिष्य नाही’ हे सांगणाऱ्या गाडगेबाबांनी जीवनातील प्रत्येक बाबीकडे चिकित्सक, डोळसपणे बघण्याचा संदेश दिला. संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतीबा फुले यांच्यासारख्या महामानवांचे सुधारणावादी, सत्यशोधक विचार, लोकसेवेचं कार्य त्यांनी समर्थपणे पुढं नेलं. प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचं मोठं योगदान आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना अभिवादन केलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, संत गाडगेबाबा हे सत्यशोधक विचारांचे क्रांतिकारी समाजसुधारक होते. अडाणी राहू नका. अंधश्रद्धा ठेवू नका. कर्ज काढू नका. व्यसन करु नका. जातीभेद-अस्पृश्यता पाळू नका. माणसात देव शोधा, दीन-दुबळे, रंजले-गांजले, अनाथ-अपंगांची सेवा करा, अशा सोप्या भाषेत त्यांनी समाजप्रबोधनाचं कार्य केलं. संत गाडगेबाबा हे कृतीशील संत होते. त्यांचे विचार, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं किर्तन हे सारं ‘शब्दात व्यक्त करण्यापलिकडचं’ असल्याचं कौतुक खुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी केलं होतं. आचार्य अत्रे यांनी त्यांचा गौरव ‘महाराष्ट्राचं समाजवादी व्यासपीठ’ असा केला होता. प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणीत संत गाडगेबांच्या विचारांचं, कार्याचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्रात त्यांच्या नावानं कार्यरत असलेलं अमरावतीचं संत गाडगेबाबा विद्यापीठ, राज्यभरातील विविध संस्था, संघटना, त्यांच्या नावानं सुरु विकास योजना महाराष्ट्राच्या पुरोगामी जडणघडणीत, विकासात कायम योगदान देत राहतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.