Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अतिदुर्गम बिनागुंड्यात आरोग्य सेवेची पाऊलवाट : गडचिरोली पोलीस दलाचा उपक्रम, २५० हून अधिक नागरिकांची तपासणी

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत मूलभूत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने नवनिर्मित पोमके बिनागुंडा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात बिनागुंडा, कुवाकोडी, फोदेवाडा तसेच आसपासच्या दुर्गम गावांतील सुमारे २५० हून अधिक नागरिक व विद्यार्थ्यांची तज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली.

पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली,जिल्हा परिषद गडचिरोली आणि Central Reserve Police Force (केंद्रीय राखीव पोलीस दल) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणे, प्राथमिक तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून देणे आणि गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करणे हा या शिबिरामागील मुख्य हेतू होता. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य मेळावा पार पडला.

या शिबिरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे (स्त्रीरोग तज्ञ), महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके (शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. प्रशांत पेंदाम (बालरोग तज्ञ), पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल मडावी, डॉ. गणेश चिचघरे तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ०९ क्रमांकाच्या बटालियनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. मोहन यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची तपासणी करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिबिरादरम्यान विविध आजारांची तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधे वितरित करण्यात आली. पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन देण्यात आले. १४ नागरिकांना पुढील तपासणीसाठी विविध रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले. बालरोग तज्ञांकडून शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली, तर स्त्रीरोग तज्ञांकडून गर्भवती माता व इतर महिलांना सल्ला देण्यात आला.

विशेष म्हणजे, गडचिरोली पोलीस दलाने सन २०२१ पासून आतापर्यंत १७८ आरोग्य मेळावे आयोजित करून तब्बल ४०,०१५ नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. पाच रक्तदान शिबिरांतून ४,३६१ रक्तघटकांचे संकलन करण्यात आले आहे. तसेच ‘ऑपरेशन रोशनी’ या उपक्रमांतर्गत ९,९७१ पेक्षा अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करून १,४१२ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

सदर उपक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ०९ क्रमांकाच्या बटालियनचे कमांडंट शंभु कुमार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी, कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. नवनिर्मित पोमके बिनागुंडाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रोहन शिरसाट, सागर मोरे, शुभम भगत व इतर अंमलदारांनी शिबिर यशस्वीरीत्या पार पाडले.

अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्याचा हा प्रयत्न केवळ वैद्यकीय मदतीपुरता मर्यादित नसून, विश्वास आणि प्रशासन यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणारा ठरत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.