Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करा – अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 11 एप्रिल :- मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

या पत्रात मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी व गारपीठीने पशुधनाच्या व घरांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करावी. वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांच्या व पारस येथील दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना एनडीआरएफमधून ४ लाख व मुख्यमंत्री मदत निधीतून ६ लाख रुपयांची मदत करावी. निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार तसेच बेदाणा प्रक्रिया उद्योगांना भरीव मदत करावी. मागील खरीपात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करण्यात आली होती. २७ मार्च २०२३ च्या नवीन आदेशामुळे दुप्पट मदतीचा निर्णय बदलून एनडीआरएफच्या जुन्या निकषात मामुली वाढ केलेली आहे. या नवीन आदेशाचा फेरविचार करुन एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदतीबाबतचा निर्णय सरकारने घ्यावा. सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषीत करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. तथापि यासाठी NDVI चा नवीन निकष निश्चित करण्यात आला आहे. या निकषामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. त्यामुळे या निकषाचा फेरविचार करावा अशी मागणीही अजित पवार यांनी पत्रात केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याशिवाय पीक कर्जासाठी सिबिलची अट रद्द करण्याबाबत केंद्र सरकारशी बोलून केंद्र सरकारतर्फे रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून बँकांसाठी सुस्पष्ट परिपत्रक काढावे. पूर्व विदर्भातील टसर रेशीम शेती वाचवण्यासाठी वन अधिकारी व टसर शेती उत्पादक शेतकरी यांच्यात समन्वय साधून सुरक्षितपणे हा व्यवसाय पुढे कसा सुरू राहिल याबाबतीत सरकारने युध्दपातळीवर प्रयत्न करावेत अशा प्रमुख आठ मागण्या अजित पवार यांनी पत्रात केल्या आहेत.

दरम्यान हातातोंडाशी आलेला घास लागोपाठ आलेल्या अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी खचून गेला आहे. शेतीसाठी केलेला खर्चदेखील निघेल की नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.