पळसगाव अरतोडी महादेव गडावर महाशिवरात्री उत्साहात; माजी सभापती परसराम टिकले यांच्या हस्ते महापूजा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथील अरतोडी महादेव गडावर महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. गडावरील प्राचीन महादेव मंदिरात देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले यांच्या हस्ते विधीवत महापूजा करण्यात आली.
सकाळपासूनच भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविकांनी गड चढण्यास सुरुवात केली होती. “हर हर महादेव”च्या जयघोषात परिसर दुमदुमला होता. डोंगरमाथ्यावर वसलेल्या या देवस्थानात महाशिवरात्री निमित्त विशेष पूजा-अर्चा, अभिषेक आणि आरतीचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी देवस्थान समितीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विधाते मॅडम, निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप वरखडे, पळसगाव क्षेत्र सहाय्यक बोरकर, वनविकास महामंडळाचे क्षेत्र अधिकारी बारस्कर, सहाय्यक लट्याये मॅडम, अध्यक्ष पुंडलिक घोडाम, उपाध्यक्ष श्रीराम ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम, गणेश मातेरे, घनश्याम माकडे, रमेश वाढई, रामजी मानकर, रेवनाथ चव्हारे, रामकिसन ढोरे, ललिता टिकले, दुर्वास नाईक, तुळशिदास बाडे, पुराणिक गायकवाड, हिरालाल कानतोडे, अशोक भोयर, नरहरी पिलारे यांच्यासह सदस्यगण व शेकडो भाविक उपस्थित होते.

महादेव गड पहाडी सार्वजनिक देवस्थान समिती, पोलीस विभाग, तहसील प्रशासन, ग्रामपंचायत, वनविभाग तसेच वनविकास महामंडळ यांच्या समन्वयातून यात्रेकरूंसाठी पाणी, आरोग्य सुविधा, वाहतूक नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनाची योग्य व्यवस्था करण्यात आली. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
महाशिवरात्री निमित्त सुरू झालेल्या या धार्मिक यात्रेचा समारोप २३ फेब्रुवारी रोजी होणार असून, दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रद्धा, परंपरा आणि ग्रामएकतेचे प्रतीक असलेला हा उत्सव परिसरातील भाविकांसाठी आध्यात्मिक उर्जेचा स्रोत ठरत आहे.

