Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली मधील मॉडेल कॉलेज राज्यात आदर्श करणार: उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

Get real time updates directly on you device, subscribe now.

गोंडवाना विद्यापठातील मॉडेल कॉलेजचे भूमिपूजन व डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

  • “उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय@गडचिरोली” या कार्यक्रमात 454 तक्रार अर्ज निकाली
  • शासकीय विज्ञान महाविद्यालयात मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली, दि. 04 फेब्रुवारी: गडचिरोली जिल्हयातील होणारे मॉडेल कॉलेज हे खऱ्या अर्थाने राज्यात आदर्श करणार असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. ते आज गडचिरोलीत “उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय@गडचिरोली” या कार्यक्रमासाठी व मॉडेल कॉलेजचे भूमिपूजन तसेच डेटा सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी ते म्हणाले गोंडवाना विद्यापीठात आता पहिल्या टप्यात 50 एकर जागेत तातडीने अद्यावत शैक्षिणिक सुविधा उभ्या केल्या जाणार आहेत. यातून अगदी इतर विद्यापीठेही या होणाऱ्या नवीन सुविधा पाहण्यास येतील अशी आशा मला आहे. विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून सर्वच राजकिय पक्ष व प्रशासन यांनी सांघिक भावनेतून काम केल्यास शैक्षणिक क्षेत्रात आपले राज्य देशात नंबर एक वर असेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. विद्यापीठास 12 ब चा दर्जा मिळाला, डाटा सेंटर झाले, मॉडेल कॉलेजचे भूमिपूजनही केले तर आता विद्यापीठास फॉरेस्ट व ट्रायबल युनिव्हर्सीटीचा दर्जाही लवकरच मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितींना दिला. लवकरच गडचिरोली जिल्ह्यात जिल्ह्यातील आयएएस व आयपीएस निर्माण करण्यासाठी अद्यावत स्पर्धा परीक्षा केंद्राचेही काम सुरु करणार असे आश्वासन त्यांनी कार्यक्रमात दिले. या कार्यक्रमाला आमदार डॉ.देवराव होळी, कुलगुरु प्रा.श्रीनिवास वरखेडी, नगराध्यक्ष श्रीमती योगिता पिपरे, शिक्षण संचालक, उच्च शिक्षण विभाग डॉ. धनराज माने, शिक्षण संचालक तंत्र शिक्षण विभाग डॉ. अभय वाघ, प्र. कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, डॉ. अनिल चिताडे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाअगोदर विद्यापीठाच्या प्रशासकिय इतारतीत सुरू करण्यात आलेल्या डाटा सेंटरचे उद्घाटन मंत्री उदय सामंत यांचेहस्ते पार पडले. यानंतर विद्यापीठ आवारात उभारण्यात येणाऱ्या मॉडेल कॉलेजचे भूमिपूजन त्यांचे हस्ते करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे गोंडवाना विद्यापीठात “उच्च व तंत्रशिक्षण@गडचिरोली” या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष प्रत्येक आलेल्या तक्रार अर्जाची पाहणी केली. यावेळी प्राप्त 593 तक्रार अर्जांपैकी 454 अर्ज लगेच निकाली काढून संबंधितास अडचणी सोडविण्यासाठी आदेश निर्गमित केले. तसेच यातील 86 अर्ज प्रलंबित राहिले ते सुद्धा लवकरच निकाली काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. “उच्च व तंत्रशिक्षण@गडचिरोली” या कार्यक्रमात अनुकंपाचे 19 प्रकरणांपैकी 9 प्रकरणे निकाली काढले. त्यातील 2 जणांना त्याच दिवशी आदेशही देण्यात आले. याव्यतिरीक्त प्रलंबित 94 वैद्यकिय बिलांपैकी 33 पुर्ण वितरीत करण्यात येणार आहेत. भविष्य निर्वाह निधीच्या 57 प्रकरणांपैकी 46 वितरीत करण्यात आले . अशा प्रकारे गोंडवाना मधील विविध स्तरावरच्या अडचणी सोडविण्यासाठी “उच्च व तंत्रशिक्षण@गडचिरोली” या कार्यक्रमाची आखणी मंत्री महोदयांनी केली होती.

कार्यक्रमानंतर प्राध्यापक, विद्यार्थी व इतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी त्यांच्याकडून आलेल्या विविध सादरीकरणांची व प्रस्तावांची प्रशंसा केली. गोंडवानामधील शैक्षणिक सुविधांमध्ये आलेल्या कल्पना येत्या काळात राबविण्यासाठी अर्थ विभागाशी चर्चा करून निधीची उपलब्धता करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आपले विद्यार्थी स्वता:च्या पायावर उभे राहतील तसेच लोकशाही प्रक्रियेत लोकप्रतिनिधींची निवड अतिशय अभ्यासपूर्वक करतील यासाठी त्यांना चांगल्याप्रकारे सक्षम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. ते म्हणाले यासाठी शिक्षण प्रक्रियेत राजकारण न आणता एकत्र येवून युवा पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणे तुम्हा आम्हा सर्वांचे लक्ष असले पाहिजे. राज्यातील परिक्षा 3.5 लाख विद्यार्थ्यांनी दिल्या. एकालाही कोरोना बाधा झाली नाही. तसेच उर्वरीत 97 टक्के विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परिक्षा झाल्या. या सर्व परिक्षा राज्य शासनाने देशात आदर्शवत पार पाडल्या. यासाठी प्राध्यापक, विद्यार्थी, पोलीस तसेच महसूल विभागाचे अभिनंदन करायला हवे. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.

शासकीय विज्ञान महाविद्यालयातील वसतिगृहाचे उद्घाटन : गडचिरोलीमधील चामोर्शी रस्त्या वरील शासकिय विज्ञान महाविद्यालयातील मुला मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. या कार्यक्रमात विज्ञान कॉलेजला आवश्यक 5 एकर जमीन तातडीने उपलब्ध करून देवू असे आवश्वासन त्यांनी यावेळी दिले. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन मधून देणेसाठी पालकमंत्र्यांना विनंती करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वानखेडे यांनी महाविद्यालयाबद्दल माहिती सांगून प्राध्यापकगण यांच्याविषयी माहिती देवून महाविद्यालयाच्यावतीने शैक्षणिक प्रगतीबद्दल माहिती दिली.

गोंडवाना विद्यापीठातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण कुलगुरु प्रा. श्रीनिवास वरखेडी त्याच्या तर्फे करण्यात आले. कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा यावेळी स्वागत व सत्कार केला. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विद्यापीठातील विविध पुरस्काराचे वितरणही यावेळी करण्यात आले. तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी केले. तसेच सुत्रसंचलन प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.