नागपुरात तीन गुंडांचे खून.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. १६ नोव्हेंबर : दिवाळीचा दुसरा दिवस रविवार नागपूरकरांकरिता रक्तरंजित ठरला आहे. दोन गुंडांच्या टोळीमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर एका टोळीतील तीन गुंडांचा खून करण्यात आला. त्यामध्ये दोघांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. तिसऱ्या मृतदेहाची ओळख पटविणे सुरू आहे.
नागपूर शहरात गुंडामध्ये गँगवार पेटले आहे. कुख्यात गुंड विजू नोहोड हत्याकांडाचा बदला म्हणून त्याच्या तीन साथीदारांनी रविवारी रात्रीच्या सुमारास प्रतिस्पर्धी टोळीतील दोन गुंडांचे बळजबरीने अपहरण केले. त्यानंतर त्यांची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. या हत्येची खळबळजनक घटना सोमवारी सकाळच्या सुमारास पाचगाव-कुही रोडवरील डोंगरगावजवळ उघडकीस आली. कुणाल ठाकरे, रा. नरसाळा व सुशील बावणे, रा. राऊतनगर, दिघोरी असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत. विजू मोहोड खुनाच्या बदल्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तर, ग्रामीण एलसीबी पथकाचे प्रमुख अनिल जिट्टेवार यांच्या नेतृत्वातील पथकाने अथक परिश्रम करून अवघ्या काही तासातच या घटनेचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. आरोपींनी तीक्ष्ण शस्त्र व सिमेंटच्या खांबाने वार करून त्यांना जागीच ठार केले. अपहरण करण्यासाठी कारचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. दोन खुनांच्या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Comments are closed.