नागेली पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर
विक्रीत घट; ग्राहकांची संख्याही रोडावली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वाशीम, 10 जानेवारी:- हिंदू धर्मात विड्याचे पान याला अनन्य साधारण महत्व आहे. विड्याची पाने सर्वांनाच खायला खूप आवडतात. जेवणानंतर मुख वास म्हणून आपल्याकडे याचा वापर करतात. तसेच ते धार्मिक विधीतही त्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. लग्न समारंभ, देव पूजा, इतर धार्मिक कार्यक्रमात नागेली पानाला फार महत्व आहे. आजच्या धावपळीच्या युगात पानशौकीनांची संख्या घटली असून, खर्रा, गुटखा पुड्या आदींना महत्व आले आहे. त्यात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नागेली पानमळ्यांना बसत असून, मळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तर कोरोनामुळे पानांची विक्री घटली असल्याचे विक्रेत्यांनी सांगीतले.
वाशीम तालुक्यातील काटा, मालेगाव तालुक्यातील शिरपूर, रिसोड तालुक्यातील भर जहांगीर याठिकाणी एकेकाळी पानमळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. एकदा लावलेला पानमळ्याचे आयुष्य किमान चार वर्ष असते. पानमळ्याला दर चार दिवसाआड पाणी द्यावे लागते. परंतु, सतत पडत असलेल्या दुष्काळाने सिंचन विहिर, बोअरवेल यातील पाणी उन्हाळ्यापर्यंत पुरत नसल्याने पानमळे सद्यस्थिती नामशेष होत आहे. वाशीम जिल्ह्यात शिरपूर या गावात चार दोन शेतकर्यांकडे पानमळे असल्याचे दिसते. पानमळ्या सोबतच विक्रेत्यांची संख्याही घटली आहे. पान विक्रीचा व्यवसाय हा अनेकांकडे पिढीजात आहे. परंतु, कोरोनामुळे पान विक्रीतही मोठी घट झाली आहे.
(हे पण वाचा :- शासकीय गोदामातील पावणेदोन कोटींच्या ज्वारीची सव्वादोन लाखांत विक्री)
पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय चालत आल्यामुळे दुसरा व्यवसाय करणेही आता शक्य नाही. सद्य: स्थितीत महागाईने कळस गाठला आहे. 20 वर्षापूर्वी पानांना चांगली मागणी होती. त्या मानाने आता मागणी राहिलेली नाही. पानशौकिनही कमी झाले आहेत. आजमितीस सणावाराला पानांची थोडी बहुत विक्री होते. जिल्ह्यात कलकत्ता येथून कलकत्ता पानांची तर हुन्नर, विशाखा पट्टणम, बिजवाडा, कर्नाटक, येथून क्युरी पानांची आवक होते. शहरात जवळपास चार ते पाच दुकाने ही पान विक्रेत्यांची आहेत.
मी गेल्या 30 वर्षापासून पान विक्रीचा व्यवसाय करतो. त्याकाळी वाशीम जिल्ह्यातच नागेली पाने मिळायची. परंतु, आता मळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे इतर राज्यातून पानाची आवक वाशीम जिल्ह्यात होते आणि तेच पाने आम्ही खरेदी करुन किरकोळ विक्री करतो. मागील काही वर्षापासून पान विक्रीत प्रचंड घट झाली. त्यामुळे दिवसभर विक्री करुनही मजूरी मिळणे अवघड झाले आहे. सध्या कलकत्ता पान 400 रुपयास 100, क्युरी पान 60 रुपयास 100 या प्रमाणे विक्री करतो. परंतु, सध्या म्हणावी तशी विक्री होत नाही. त्यामुळे घरखर्चही भागत नाही.
Comments are closed.