Get real time updates directly on you device, subscribe now.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
देसाईगंज, 11 एप्रिल :-देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावात अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढल्याने ग्राम समिती, गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या गावातील २३ दारूविक्रेत्यांना नोटीस बजाविले आहे. नियमाचे उल्लंघन करून अवैध व्यवसाय सुरूच ठेवल्यास २० हजारापर्यंतचा दंडही वसूल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा हे गाव दोन वेळा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित आहे. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून एकाला बघून एक अशा तब्बल २३ विक्रेत्यांनी अवैध व्यवसाय सुरु केला. इतर राज्यातून आलेले लोकही पावडर मिश्रित ताडीचा व्यवसाय करीत आहेत. परिणामी गावातील युवापिढी व्यसनाच्या आहारी जात आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा
दारू विक्रेत्यांची संख्या वाढल्याने गावातील नागरिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार सूचना करून अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगत आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत समिती, मुक्तीपथ गाव संघटनेच्या महिलांनी पुढाकार घेत गावातील संपूर्ण दारूविक्रेत्यांना नोटीस बजावले आहे. सोबतच पहिल्यांदा विक्री करताना आढळून आल्यास पाच हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा विक्री केल्यास दहा हजार आणि तिसऱ्यांदा विक्री करतांना निदर्शनास आल्यास वीस हजार रुपये दंड दारू विक्रेत्यांकडून आकारण्यात येणार आहे. सोबतच दंडाची रक्कम न दिल्यास तेवढ्या रकमेची वस्तूची जप्ती सुद्धा करण्याचा इशारा दारू विक्रेत्यांना नोटीसच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी ग्रामपंचायत समितीचे अध्यक्ष, सरपंच, गावचे पोलीस पाटील, गावातले पदाधिकारी आणि मुक्तीपथ टीम उपस्थित होते.
Comments are closed.