Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नगरपरिषद निवडणुकासाठी तिसऱ्या दिवशी फक्त दोनच नामांकन, वातावरण अद्याप शांत

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्ह्यातील तीन नगर परिषदांमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेला मंद गती लाभताना दिसत आहे. पहिल्या दोन दिवसांत अर्जांचा अभाव असल्यानंतर, बुधवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी केवळ दोनच नामांकनपत्रे दाखल झाली. त्यात गडचिरोलीत सदस्यपदासाठी एक, तर आरमोरीत नगराध्यक्षपदासाठी एक अर्ज दाखल झाला आहे. मात्र व्यापारी शहर देसाईगंजमध्ये अजूनही पूर्ण शांतता आहे.

या पार्श्वभूमीवर, यंदा अपक्ष उमेदवारांची भाऊगर्दी कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सर्वच इच्छुकांनी प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न तीव्र केल्याचे जाणवते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरमोरी येथे नगराध्यक्षपदासाठी वेणूताई ज्ञानेश्वर ढवगाये यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नामांकन दाखल केले आहे. नगरसेवकपदासाठी मात्र एकही अर्ज आलेला नाही.

गडचिरोली नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक १३ ‘अ’ मधून वंचित बहुजन आघाडीचे बाळकृष्ण असुराज टेंभुर्णे यांनी नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल केले आहे. मात्र, इतर कोणत्याही प्रभागातून किंवा नगराध्यक्षपदासाठी अद्याप अर्ज सादर झालेले नाहीत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

देसाईगंज नगरपरिषद क्षेत्रात परिस्थिती पूर्णतः शांत असून, येथे नगराध्यक्ष किंवा नगरसेवकपदासाठी कोणीही नामांकन दाखल केलेले नाही. स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे आखली जात असली तरी सर्व हालचाली पडद्यामागेच सुरू असल्याचे स्पष्टपणे जाणवते.

नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असून, त्यात शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असल्याने अर्ज सादर करण्यासाठी फक्त तीन दिवस — गुरुवार, शुक्रवार आणि सोमवार — एवढाच कालावधी उरला आहे.

दरम्यान, गडचिरोली नगराध्यक्षपदासाठी चुरस शिगेला पोहोचली आहे. काँग्रेसकडून उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात असली तरी भाजपमध्ये नवे-जुने गटांतील वाद अजून मिटलेले नाहीत. माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, भाजप जिल्हा महामंत्री व “आधार विश्व फाउंडेशन”च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या गीता हिंगे, तसेच नव्याने पक्षात दाखल झालेले दोन इच्छुक या सर्वांमध्ये उमेदवारीची लॉटरी कोणावर निघते, हे पुढील दोन–तीन दिवसांत स्पष्ट होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.