मकर संक्रांतीपूर्वीच नायलॉन मांजा विक्रेत्यावर पोलिसांनी कारवाई; धोकादायक मांजा जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी (गडचिरोली) : आगामी मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे मानवी जीव, पक्षी व प्राण्यांच्या सुरक्षेला निर्माण होणारा गंभीर धोका लक्षात घेता, अहेरी पोलिसांनी वेळेत आणि ठोस पावले उचलत नायलॉन मांजा विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असून, विशेषतः दुर्गम व आदिवासीबहुल भागात पोलिसांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मा. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या स्पष्ट आदेशानुसार नायलॉन मांजा विक्री व वापरास प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मा. उपविभागीय पोलीस अधिकारीअजय कोकाटे (अहेरी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल ओकरे यांनी प्रभावी कारवाई केली.
दि.८ जानेवारी रोजी आलापल्ली येथे रोहित राजू खांडरे (वय २१, रा. आलापल्ली) हा आपल्या दुकानात नायलॉन मांजा विक्री करीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अहेरी पोलिसांनी तत्काळ छापा टाकून दुकानाची झडती घेतली असता, सुमारे ३ हजार रुपयांचा नायलॉन मांजा आढळून आला. सदर मुद्देमाल जप्त करून संबंधित विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
नायलॉन मांजा हा अतिशय धारदार व प्राणघातक असल्याने अनेक ठिकाणी दुचाकीस्वारांचे अपघात, गळ्याला गंभीर इजा तसेच पक्ष्यांचे मृत्यू घडल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर अहेरी पोलिसांनी केलेली ही कारवाई केवळ कायद्याची अंमलबजावणी नसून मानवी आणि पर्यावरणीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, पोलीस विभागामार्फत नागरिकांना स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे की, मकर संक्रांत सणाच्या आनंदात नायलॉन मांजाचा वापर टाळावा. या मांजामुळे मानव, पक्षी व प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षित आणि पारंपरिक सूती धाग्याचा वापर करून सण साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई सपोनि मंगेश वळवी, पोउपनि दिनेश येवले, नापोशि ज्ञानेश्वर निलावार, नापोशि महेश सडमेक, पोशि बिनोद आत्राम यांच्या सहभागातून यशस्वीरीत्या पार पडली.

