गडचिरोली जिल्ह्यात आज पासून रस्ता सुरक्षा अभियान
अपघात मुक्त जिल्हा अशी ओळख निर्माण करावी – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार
गडचिरोली, दि. 18 जानेवारी: केंद्र शासनाने 32 वे रस्ता सुरक्षा अभियान, दि. 18 जानेवारी 2021 ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीकरीता आयोजित केलेले आहे. सदर निर्देशास अनुसरुन जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, गडचिरोली यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात शासनाचे सर्व विभाग यांना रस्ता सुरक्षा अभियान सेवाभावी संस्थांच्या मदतीने लोकांचा सहभाग घेऊन राबविण्याचे निर्देश दिलेत.
आज मुंबई येथे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असून त्याच धर्तीवर जिल्हा रस्ता सुरक्षा गडचिरोलीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्याकडून प्राप्त निर्देश व सूचना नुसार आज, दि. 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाणार आहे. सदर अभियानादरम्यान रस्ता सुरक्षा विषयी नियमांची जनजागृती करणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर पोलीस विभाग व परिवहन विभाग यांचेमार्फत तपासणी मोहिम राबविले जाणार आहे. या अभियानाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, रस्ता सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन अपघात मुक्त जिल्हा अशी ओळख निर्माण करावी व प्राणहानी तसेच वित्तहानी टाळावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी कळविले आहे.
Comments are closed.