Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संकटग्रस्त स्त्रीत्वाच्या संरक्षणासाठी ‘सखी’चा विश्वास — गडचिरोली जिल्ह्यात 469 महिलांना दिलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

रवि मंडावार: शोषण, अन्याय, हिंसाचार यांना सामोऱ्या जाणाऱ्या संकटग्रस्त महिलांसाठी केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या ‘सखी वन स्टॉप सेंटर’ या महत्त्वाकांक्षी योजनेने गडचिरोली जिल्ह्यात खर्‍या अर्थाने ‘न्याय आणि आधार’ प्रदान करण्याचे कार्य सुरू केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात केंद्र सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या या सेंटरद्वारे आतापर्यंत ४६९ महिलांना आणि अल्पवयीन मुलींना तातडीची मदत पुरविण्यात आली असून, त्यांच्यासाठी आश्रय, समुपदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदतीचा संपूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे.

सखी वन स्टॉप सेंटर ही योजना १ एप्रिलपासून संपूर्ण देशभर लागू करण्यात आली असून, गडचिरोलीमध्येही तिचा कार्यक्षम अंमलबजावणी सुरू आहे. लैंगिक, मानसिक, भावनिक किंवा आर्थिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांना केवळ सहवेदना नव्हे तर ठोस मदतीची गरज असते आणि ती ‘सखी’ या नावातच दडलेली आश्वासकता देते. या सेंटरमध्ये एकावेळी पाच महिलांसाठी सुरक्षित निवाऱ्याची, चहा, नाश्ता व भोजनाची सुविधा उपलब्ध असून, त्यांना किमान पाच दिवसांचा तात्पुरता निवारा पुरविण्यात येतो. त्या काळात समुपदेशन, पोलिस सहकार्य, वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर सहाय्याचे एकात्मिक व्यवस्थापन एकाच छताखाली मिळते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली, महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या योजनेची केंद्र प्रशासक प्रणाली सुर्वे यांनी माहिती दिली. “संकटग्रस्त महिलांसाठी समाज, कुटुंब आणि यंत्रणांचे दरवाजे बंद झाले तरी ‘सखी वन स्टॉप सेंटर’चे दरवाजे सदैव उघडे आहेत,” असे सांगत त्यांनी गरजू महिलांनी थेट सेंटरला भेट द्यावी किंवा १८१ महिला हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन केले. आतापर्यंत १८१ वरून ११ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यावर संबंधित गावी भेट देऊन वस्तुस्थितीची खात्री करून तात्काळ उपाययोजना करण्यात आली.

या सेंटरमध्ये केवळ वैद्यकीय वा पोलिस मदतीपुरते कार्य मर्यादित नाही, तर गर्भवती कुमारी मातांची प्रसूती, नको असलेल्या बाळांचे कायदेशीर पुनर्वसन, पीडित मुलांचे शालेय व सुधारगृहात दाखल करणं, मनोरुग्ण महिलांसाठी उपचार, कौटुंबिक मतभेद निवारण आणि समुपदेशन यासारख्या जबाबदाऱ्या अत्यंत निष्ठेने पार पाडल्या जात आहेत. गृहहिंसा, घटस्फोट, माहेरी वा सासरी होणारा छळ, प्रेमसंबंधातून निर्माण झालेली गुंतागुंत अशा अनेक स्थितीत महिलांना इथे मूलगामी उपाय सुचवले जातात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यामुळे अनेक भगिनींच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण झाला आहे. नातेवाईकांचा आधार हरवलेल्यांना इथे मैत्रीचा, समजुतीचा आणि सन्मानाचा हात मिळतो. प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या या सेंटरने ‘सखी’ या शब्दाला भावनिक, सामाजिक आणि कायदेशीर अर्थानेही अर्थपूर्ण बनवले आहे.

ही योजना म्हणजे केवळ सरकारी उपक्रम नव्हे, तर एक मानसिक आधारकेंद्र आहे. संकटात असलेल्या महिलांनी लाज न बाळगता, भय न बाळगता, थेट संपर्क साधून आपल्या संघर्षात साथ मिळवावी, यासाठी सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रशासकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकच ध्येय बाळगले आहे – “ती एकटी नाही… तिच्यासोबत ‘सखी’ आहे!”

 

Comments are closed.