Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिंगणापूर मंदिर वाद : मुस्लिम कर्मचारी हटवले, देवस्थानचा निर्णय आंदोलनाआधीच

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

शनिशिंगणापूर : शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांकडून शनीदेवाच्या चौथऱ्यावर काम केल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादानंतर देवस्थान प्रशासनाने तातडीने मोठा निर्णय घेत ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांसह एकूण १६७ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवत १४ जून रोजी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्याआधीच देवस्थान प्रशासनाने ही कारवाई केल्याने आता संभाव्य आंदोलनाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी शनिशिंगणापूर मंदिराच्या गर्भगृहात मुस्लिम मजुरांकडून चौथऱ्यावर डागडुजीचे काम करण्यात आल्याने हा वाद पेटला होता. ही बाब समोर येताच विविध संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. देवस्थानमध्ये गैरहिंदू कर्मचाऱ्यांनी पूजा स्थळी काम करणं हे भाविकांच्या श्रद्धेचा अपमान असल्याचं सांगत, हे कर्मचारी तात्काळ हटवण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने शिस्तभंग, नियमभंग आणि अनियमित कामगिरीच्या कारणावरून संबंधित कर्मचाऱ्यांना हटवल्याची माहिती दिली आहे. विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी स्पष्ट केलं की, धार्मिक आधारावर नव्हे, तर प्रशासनिक कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वादात आलेल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी या निर्णयाचं स्वागत करत, राज्यातील कोणत्याही हिंदू मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांना ठेवण्यास समाज तयार नाही, असा इशाराही दिला आहे. शनिशिंगणापूरमधील घटनेनंतर राज्यातील इतर मंदिर व्यवस्थापनांनाही अशाच प्रकारच्या मागण्या जोर धरू लागण्याची चिन्हं आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मंदिर प्रशासनाच्या या तातडीच्या निर्णयामुळे वाद तात्पुरता शांत झाल्यासारखा भासतो आहे, मात्र धार्मिक भावना, कर्मचाऱ्यांची जात-धर्म ओळख आणि मंदिर व्यवस्थापन यावरून पुन्हा एकदा समाजात मतभेद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments are closed.