सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर.
- जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव
- भारताला पहिल्यादाचं मिळाला सन्मान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सोलापूर, दि. ४ डिसेंबर: युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात येतो.सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत डिसले प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतात. या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 12 हजार नामांकनं दाखल झाली होती. त्यापैकी 10 शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं. त्यात रणजितसिंह डिसले यांचंही नाव होतं.
डिसले यांच्यासोबतच इटली, ब्राझिल, व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि यूकेमधील शिक्षक हे या यादीतल्या टॉप 10 मध्ये होते. डिसले यांच्या निर्णयामुळे या शिक्षकांना प्रत्येकी जवळपास 40 लाख रुपये मिळणार आहेत.
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ जाहीर झाला असून सोलापूर च्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झाला. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली.
असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांतील 12 हजार हुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळेल.
बच्चू कडू यांच्याकडूनही डिसले गुरुजींचं अभिनंदन
“युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला आहे. अभिनंदन!”, असं ट्वीट करत बच्चू कडू यांनी डिसले गुरुजींचं कौतुक केलं आहे.
राज्याच्या तसेच देशाच्या सुद्धा शिरपेचात मानाचा तुरा रोवला : सतेज पाटील
“अभिमानास्पद! युनेस्को व वार्की फाउंडेशन, लंडनतर्फे दिला जाणारा मानाचा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडीतील जिल्हा परिषदे शाळेचे शिक्षक रणजीत डिसले यांना मिळाला असून त्यांच्या या कामगिरीमुळे राज्याच्या तसेच देशाच्या सुद्धा शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.”, असं ट्वीट करत सतेज पाटील यांनी डिसले गुरुजींचं कौतुक केलं आहे. पुढे बोलताना “आजवर शिक्षण क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना मिळालेली ही पोचपावती आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा!”, असंही सतेज पाटील म्हणाले.
… आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे : सुप्रीया सुळे
“युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा “ग्लोबल टीचर अवॉर्ड” या पुरस्कारासाठी या वर्षी सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!”, असं म्हणत सुप्रीया सुळे यांनी रणजीत डिसले गुरुजींचं अभिनंदन केलं आहे. पुढे बोलताना “ग्लोबल टीचर अवॉर्ड”साठी रणजितसिंह डिसले यांची निवड झाली, याबद्दल आम्हांला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. रणजितसिंह डिसले यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांची यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!” असं राष्ट्रवादी नेत्या सुप्रीया सुळे म्हणाल्या.
Comments are closed.