गाव पाड्यांना रस्ते आणि इतर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा उद्या निर्णायक रस्ता रोको.
ढीम्म प्रशासनाविरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर, 22ऑगस्ट :- पालघर मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्त्याची कामे तसेच, वनजमीन,घराखालील जागा नावी करणे,जातिचे दाखले व इतर मागण्यांसाठी श्रमजीवी संघटना उद्या पालघर येथे निर्णायक रस्ता रोको आंदोलन करणार आहे. उद्या 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता चाररस्ता येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
या अगोदर श्रमजीवी संघटनेच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना या समस्या सोडवण्याबाबत पत्र दिले होते, मात्र प्रशासनाने याबाबत कोणतीच दखल घेतली नसल्याने आंदोलना शिवाय पर्याय नसल्याचे श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी म्हटले आहे.
आदिवासी बहुल असलेला पालघर जिल्हा २०१४ साली नव्याने निर्माण करण्यात आला त्याच प्रमाणे पालघर तालुका हे जिल्ह्याचे ठिकाण असून जिल्हा मुख्यालयाच्या शेजारील आदिवासी गाव पाड्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. १०० टक्के आदिवासी वस्ती, पेसा ग्रामपंचायती असताना शासानाने या ग्रामपंचायत मध्ये अनेक योजना तयार केल्या आदिवासी लोकवस्ती सुधार योजना अस्तीत्वात असताना देखील आज स्वातंत्र्या च्या ७५ वर्षानंतर देखील आदिवासींचा विकास होताना दिसत नाही. अशी खंत देखील सुरेश रेंजड यांनी व्यक्त करत उद्याच्या आंदोलनाची दखल राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला घेण्यास भाग पाडू असे तीव्र आंदोलन श्रमजीवी संघटना करणार असल्याचा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालघर तालुक्यातील सोनावे – दारशेत – उंबरपाडा या ग्रामपंचायती पेसा अंतर्गत येत असून देखील मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकवस्ती आहे. सोनावे- दारशेत – उंबरपाडा हा रस्ता वसई तालुक्यातील खानिवडे या गावाला मुख्य महामार्गाला जोडणारा रस्ता आहे, मात्र दारशेत – उंबरपाडा ग्रामपंचायत मधील खाणपाडा येथील काही शेतकरी रस्त्यासाठी जागा देत नसल्याने हा रस्ता अपुर्ण आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर रेतीची वाहतूक मोठ्याप्राणावर होत असल्याने रस्तावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. परंतु याबाबत तक्रार केल्यावर महसूल
विभागातील अधिकारी रेती माफियांना तक्रारदाराचे नाव सांगतात व रेती माफिया व तक्रारदाराशी वाद घालतात. अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश पवार यांनी दिली आहे.
याचसोबत दुर्वेस ते पांचुधारा येथील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यांच्या माध्यमातून २०१७ रोजी सुरू करण्यात आला होता परंतू निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे त्या रस्ताची अक्षरशः चाळण झालेली आहे. हा रस्ता तातडीने दुरूस्त करण्यात यावा म्हणून संघटनेच्या माध्यमातून अनेकवेळा धरणे आंदोलने करण्यात आली संबंधीत विभागाकडून लेखी आश्वासन देवून देखील त्या रस्त्याची दुरवस्ता आजतागायत तशीच आहे. याशिवाय मौजे केळवे ग्रा.पं. मधील उपरस्ता केळवा ते मोरपाडा रस्ता, शिगाव व ग्रा.पं. मधील कातकरी पवारपाडा येथे रस्ता नाही. अशा अनेक रस्त्यांच्या प्रश्नावर शासनाचे अनेक वेळा लक्ष वेधून देखील प्रशासन ढीम्म आहे.
पालघर तालुक्यातील वनदावे मोठ्या प्रमाणात वनदावे प्रलंबित आहेत. याबाबत वनविभाग, वनविभाग महामंडळ हे वनदाव्यावर काम करण्यासाठी पूर्णपणे उदासिन आहेत.
आदिवासी बांधवांना मोहिम राबवून एक महिन्याच्या आत दाखलेदेण्याबाबत परिपत्रक काढले परंतू आज त्याला केराची टोपली दाखवत आदिवासी बांधवांना दाखल्यांपासून वंचित ठेवले जात आहे.
या सर्व विषयांवर २० ऑगस्टपर्यंत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास श्रमजीवी संघटनेने 23 ऑगस्ट रोजी पालघरच्या चार रस्ता येथे रस्ता रोको करणार असल्याचे पत्र या अगोदर दिले होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने उद्या आम्ही संघटनेच्या माध्यमातून जोपर्यंत नमुद केलेल्या प्रश्नांचा योग्य तो तोडगा निघत नाही तोपर्यंत निर्णायक रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनासाठी मोठ्याप्रमाणात श्रमजीवी सैनिक आणि स्थानिक नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश पवार यांनी दिली आहे. तसेच आंदोलनावेळी कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील अशी भूमिका दिनेश पवार यांनी लोक स्पर्श न्युज सोबत बोलताना मांडली. त्यामुळे आता या आंदोलनाची जिल्हा प्रशासन नेमकी कशी दखल घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा ,
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र कोअर कमिटी सचिव पदी गिरीष कोरामी यांची नियुक्ती.
Comments are closed.