Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली: कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाकडून नियमांची कडक स्वरूपात अंमलबजावणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

दंडात्मक कारवाईसह सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळे निर्बंध लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २६: जिल्हयात कोरोना संख्येत होत असलेल्या वाढीमूळे जिल्हा प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी अजूनही कडक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. कोरोना बाबत जिल्हयातील सर्व प्रशासकिय यंत्रणांची ऑनलाईन आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद व प्रभारी जिल्हाधिकारी तथा अति.जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांनी जिल्हयातील सर्व उप विभागीय दंडाअधिकारी, तहसिलदार व गट विकास अधिकारी यांचा कोरोना बाबत आढावा घेतला. या बैठकित कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत निर्गमित केलेल्या सूचनांची अंमलबजावणी अधिक चांगल्या प्रकारे राबविण्याच्या सूचना कुमार आशिर्वाद यांनी उपस्थितांना दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यात कोरोना रूग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतही कोरोना रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामूळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून या पुर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी योग्य प्रकारे राबविण्यासाठी सर्व यंत्रणांची बैठक घेण्यात आली. या बैठकित मास्क न वापरणाऱ्यांवर 500 रूपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मंगल कार्यालये, मॉल तसेच सिनेमागृह या ठिकाणी कोरोना बाबत काळजी न घेणाऱ्या मालकांना 5000 रूपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच इतर दुकाने, हॉटेल, जिमखाना याठिकाणी कोरोना बाबत नियमांची अंमलबजावणी न केल्यास दुकान मालकांना 2000 रूपये दंड आकारण्यात येणार आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यासाठी पोलीस, तहसिलदार, नगरपालिका व पंचायत मुख्याधिकारी तसेच गट विकास अधिकारी यांच्या अधिनस्त पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये गडचिरोली नऊ, अहेरी, आरमोरी, वडसा व चामोर्शी याठिकाणी चार-चार पथके निगराणी करणार आहेत. इतर तालुक्यात आवश्यकतेप्रमाणे दोन ते तीन पथके काम पाहणार आहेत. या पथकातील सदस्य व पोलीस यांना कोरोना बाबत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी होत आहे की नाही याच्या पाहणीसह दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील व तालुक्यावरून व्हीसी द्वारे सर्व यंत्रणांचे प्रमुख उपसिथत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोणत्या ठिकाणी निर्बंध –
• लॉन, मंगल कार्यालयात लग्न व इतर समारंभासाठी 50 लोकांची मर्यादा व कोरोना बाबत दिलेल्या निर्देशांचे पालन बंधनकारक
• कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच धान खरेदी केंद्रावर कोरोना बाबत दक्षता बाळगण्याच्या सूचना
• सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये विना मास्क ग्राहकास बंदी
• बसमध्येही विनामास्क प्रवासी चालणार नाही
• इतर जिल्हयातून येणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांनाही मास्कची सक्ती

अशी केली जाणार दंडात्मक कारवाई –
• सार्वजनिक ठिकाणी मास्क घातले नाही तर – 500 रूपये दंड
• सर्व प्रकारची दुकाने किंवा लॉजींग, हॉटेलमध्ये ग्राहकाकडून मास्क न घालणे अथवा गर्दी असल्यास – दुकान मालकाला 2000 रूपये दंड तसेच मास्क न घातलेल्या ग्राहकाला 500 रूपये दंड
• मंगल कार्यालये, लॉन, मॉल किंवा सिनेमागृह – या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी केली नसल्याचे आढळल्यास 5000 रूपयांचा मालकाला दंड तसेच मास्क न घातलेल्या उपस्थितीताला तसेच ग्राहकाला 500 रूपये दंड

दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी –
• प्रत्येकाने मास्क चा वापर करा
• शाररीक अंतर ठेवून साहित्य घ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी शाररीक अंतर राखून वावरा
• दुकानांच्या बाहेर तसेच ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते त्या ठिकाणी उभे राहण्यासाठी मार्कींग करा
• अनावश्यक बाहेर पडणे टाळा व सार्वजनिक ठिकाणची गर्दी टाळा

जिल्हयातील सर्व दुकान, हॉटेल, बाजार व इतर आस्थापनांच्या संघटनांची बैठक – प्रभारी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपसिथतीत जिल्हयातील दुकान, हॉटेल, बाजार व इतर आस्थापनांच्या संघटनांची बैठक घेणेत आली. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याबाबत सूचना उपस्थितांना केल्या गेल्या. तसेच कोणत्याही परिस्थितीत विना मास्क ग्राहकांना दुकानात प्रवेश देवू नये अशा सूचना करण्यात आल्या. प्रत्येक व्यावसायिक आस्थापनेत गर्दी न करता व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी सुचना करण्यात आल्या. यावेळी विविध संघटनांनी आपले विचार मांडले व कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी सहकार्य करू असे आश्वासन दिले.

कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी
“जिल्हयात पुन्हा लॉकडाऊन लागू नये म्हणून आम्ही काही प्रमाणात कडक स्वरूपात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवित आहोत. गेल्या वर्षभरात मोठया प्रमाणात सर्वांचे अर्थिक नुकसान झाले. पुढेही असे होवू नये म्हणून आपण आत्ताच खबरदारी घेत आहोत. मास्क वापरून तसेच शाररीक आंतर राखून आपला सार्वजनिक ठिकाणी वावर करूयात. यामूळे कोणालाही दंड होणार नाही तसेच कोरोनाला ही रोखण्यात यश येईल.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.