Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समाजकल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर कॅरम व कुस्ती स्पर्धेत झेप

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : समाजकल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या शासकीय निवासी शाळांतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. विभागीय स्तरावर झालेल्या कॅरम व कुस्ती स्पर्धांमध्ये जिल्ह्याच्या एकूण आठ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर प्रवेश मिळवला असून, ग्रामीण भागातील या यशाने जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अहेरी तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज पब्लिक स्कूल, वांगेपल्ली येथील विद्यार्थ्यांनी विभागीय कॅरम स्पर्धेत अचूक आणि संयमी खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. प्रफुल दुर्गम, धम्मरत्न दुर्गे, महेंद्र गड्डी, अश्विन कुम्मरी, निशांत कुमरी, सुशांत अट्टेल आणि कार्तिक दुर्गम या सात विद्यार्थ्यांची राज्यस्तर कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १४ व १७ वर्षाखालील गटात या विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण खेळ सादर करत गडचिरोलीचा झेंडा उंचावला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज पब्लिक स्कूल, नवेगाव येथील वरुण दुर्गम या विद्यार्थ्याने नागपूर येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरावर धडक दिली आहे. विशेष म्हणजे वरुणने कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण न घेता केवळ मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

यावर्षी समाजकल्याण विभागाच्या शाळांनी प्रथमच कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदविला असून नऊ विद्यार्थी विभागीय स्तरावर पात्र ठरले, त्यापैकी पाच विद्यार्थी अंतिम फेरीत पोहोचले. त्यामधून वरुण दुर्गमने अव्वल स्थान पटकावत राज्यस्तरावर प्रवेश मिळवला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रियांका डांगेवार, मुख्याध्यापक आंबीलकर, क्रीडा शिक्षक यश पडेलवार तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जिद्दीने आणि प्रयत्नांनी साधलेले हे यश जिल्ह्याच्या समाजकल्याण शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.