“त्या” रानटी हत्तीचा एका घरात प्रवेश ! लसनपेठमध्ये हत्तीचा धुमाकूळ, गावात भीतीचे सावट..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली २९ जुलै : चामोर्शी तालुक्यातील लसनपेठ गावात टस्कर हत्तीने चक्क एका घरात शिरून धुमाकूळ घातल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहफुलाचा सुगंध लागताच आज रात्री ९ च्या सुमारास त्या दोन टस्कर पैकी एका ने घरात घुसून साठवून ठेवलेला भातपीक (धान) आणि मोहफुल अक्षरशःसोंडीद्वारे ताव मारला. एका घरात शिरकाव करणाऱ्या या हत्तीच्या गावात येण्याने नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून आहेत. संपूर्ण शेतशिवार आणि लसनपेठ गाव दहशतीत असून वनविभागाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे.
या घटनेनंतर गावात अक्षरशः घबराट पसरली असून, पूर्वीच्या घटना डोळ्यासमोर ठेवून नागरिक आता अधिक भयभीत झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एम. तावाडे यांच्यासह वनविभागाचा कर्मचारी वर्ग , वन्यजीव रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांना रात्रभर सावध राहण्याचे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी एम तावाडे केले असून, हत्तीला परत जंगलात वळवण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे. तरीही गावकऱ्यांमध्ये विश्वासाची कमतरता जाणवत असून, रात्रभर गावातील पुरुष जागरण करण्याचा संकल्प केला आहे. सध्या दोन हत्ती डोंगरगाव अनंतपुर मार्गाने समोर मार्गस्थ झाले आहेत. मात्र रात्रीची वेळ असल्याने वन कर्मचाऱ्यासह गावकरी भयभीत झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात टस्कर हत्तींच्या हालचाली जाणवत होत्या, तरीही वनविभागाने वेळीच कारवाई न केल्याने हत्ती थेट मानवी वस्तीपर्यंत पोहोचला. व्हिडीओ फुटेजमध्ये टस्कर हत्ती लसनपेठच्या घरांजवळ वावरत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ही बाब वनविभागाच्या दक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते. जंगलापासून फारकत घेत हत्तींचे मानवी वस्तीत येणे म्हणजे पर्यावरणीय असमतोल, अन्नसाखळीचा तुटलेला क्रम, आणि प्रशासकीय दुर्लक्ष यांची एकत्रित परिणती म्हणावी लागेल.
अशा घटना नव्या नाहीत. काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यात टस्कर हत्तीच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यात दोन टस्कर हत्ती गावात घुसून दहशत निर्माण करत एक वृद्ध महिलेला जखमी केले होते. हीच टस्कर जोडी आता गडचिरोली वनविभागातील कुनघाडा तर आलापल्ली वनविभागातील चामोर्शी वनपरिक्षेत्रात दाखल झाल्याने लसनपेठ गावासह परिसरातील इतर वस्तीही थरकापून गेली आहे. प्रशासनाकडून यावर तातडीची आणि ठोस कारवाई न झाल्यास वन्यजीव आणि माणसांमधील संघर्ष पाहायला मिळणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे.
वनविभागाने या पार्श्वभूमीवर केवळ हत्तीला हाकलणे नव्हे, तर कायमस्वरूपी उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. यामध्ये जंगलातील अन्नसाखळीचा अभ्यास, गावांमध्ये सतत गस्त, ड्रोनद्वारे देखरेख, आणि हत्तींच्या मार्गांचा पूर्वानुमान यांचा समावेश असायला हवा. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्पुरते निवासस्थान, आरोग्य सेवा आणि मानसिक आधार देणेही तितकेच गरजेचे झाले आहे. कारण आज हत्ती फक्त भात चापटला, पण उद्या एखादा प्राण गमावला तर त्याचे उत्तर कोण देणार?
हे देखील वाचा,
Comments are closed.