Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जीवदानासाठी रक्तदानाची मशाल: गडचिरोलीच्या हिवताप अधिकाऱ्यांनी पेटवली माणुसकीची चळवळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

रवि मंडावार, गडचिरोली: जिल्ह्यात पुन्हा एकदा मलेरियाच्या वाढत्या साववटाने आरोग्याच्या गंभीर संकटात ढकलले असतानाच जिल्ह्यातील रक्तसाठ्यात निर्माण झालेली तुटवडा परिस्थिती अधिक भयावह बनवत आहे. मात्र अशा कठीण काळात, प्रशासनातील एका संवेदनशील अधिकाऱ्याने केवळ शब्दांचा आधार न घेत, कृतीच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारीचं अस्सल उदाहरण उभं केलं आहे. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके यांनी स्वतः ब्लड बँकेत जाऊन रक्तदान केलं आणि या कृतीतून गडचिरोलीच्या नागरिकांना तसेच आरोग्य यंत्रणेला एक स्पष्ट संदेश दिला – केवळ व्यवस्था बोलून चालत नाही, ती कृतीने घडवावी लागते. त्यांच्या सोबतच पाथ फाउंडेशनच्या समन्वयक डॉ. पूजा धुळे यांनीही रक्तदान करत एक प्रकारची प्रेरणादायी जाणीव जनमानसात निर्माण केली आहे. त्यांनी हा संदेश दिला की, संकटाच्या वेळी मदतीचा हात देणं हीच खरी समाजसेवा आणि प्रशासनातील माणुसकीची ओळख असते.

मलेरियामुळे रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत असताना त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले रक्त मिळणं ही आता केवळ औपचारिक गरज न राहता जीवन-मरणाचा प्रश्न ठरत आहे. अशा पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा हा पुढाकार म्हणजे एका सामाजिक चळवळीची सुरुवात मानली जात आहे. या वेळी गडचिरोली ब्लड बँकेचे कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी राहुल इप्पावार यांच्यासह अनेकांनी या उपक्रमास उपस्थित राहून पाठिंबा दिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा प्रशासनाने या अभियानाचे स्वागत करत नागरिकांनीही अशा विधायक प्रयत्नात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. रक्तदान हे केवळ एक वैद्यकीय क्रियाकलाप नसून ते एका जीवाला जीवनदान देणारे पवित्र कार्य आहे, आणि गडचिरोलीतून सुरू झालेला हा सुरेल सुर आता समस्त जनतेच्या मनात नवी जाणीव, नवचैतन्य आणि समाजभान निर्माण करेल, हीच अपेक्षा.

Comments are closed.