Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दुर्गम डोंगराळ गावातील आदिवासींना शासकीय योजनांचा लाभ

भारी (ता. जिवती) येथे 'शासन आपल्या दारी' उपक्रम

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चंद्रपूर, 8 जून- महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील टोकावरचे गाव…..दुर्गम डोंगराळ भाग…. आदिवासी बहुल लोकसंख्या….. त्यातच रखरखत्या उन्हात ओसांडून वाहणारा नागरिकांचा उत्साह…..स्थानिक शाहीर संभाजी ढगे यांच्या आवाजात ‘शासकीय योजनांची जत्रा, योजना कल्याणकारी; विकास करण्या जनतेचा, शासन आलं आपल्या दारी.’ या गीताने रंगत भरली. निमित्त होते, ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मौजा भारी (ता. जिवती) येथील आदिवासी बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्याचे.

यासाठी जिल्हा प्रशानाचे वरिष्ठ अधिकारी भारी गावात दाखल झाले. यावेळी स्थानिक आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मरुगानंथम एम., उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार दीपक वाझाडे, गावचे सरपंच लक्ष्मीकांत कोटनाके यांच्या उपस्थितीत येथील आदिवासी बांधवाना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले की ‘शासन आपल्या दारी’ हा राज्य शासनाने सुरू केलेला एक महत्त्वकांक्षी उपक्रम आहे. लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या हक्काचे लाभ त्यांना देणे तसेच वेगवेगळ्या विभागाने एकत्र येऊन एकाच छताखाली नागरिकांपर्यंत योजना पोहोचविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शासन फक्त मदत करू शकते, मात्र स्वतःच्या परिवर्तनासाठी व गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे.

पुढे जिल्हाधिकारी म्हणाले, 15 एप्रिल पासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून सुरुवातीला हा उपक्रम 30 जूनपर्यंत राबविण्याचे ठरले होते. मात्र राज्य शासनाने आता ऑगस्ट अखेरपर्यंत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन जास्तीत जास्त नागरिकांना विविध योजनांचा एकत्रित लाभ देण्याचे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. राज्याच्या टोकावर असलेल्या भारी या गावात जिवती तालुका प्रशासनाने या उपक्रमाची अतिशय चांगली तयारी केली, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाचे अभिनंदन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, आता शासन आपल्या दारी आले असून योजनांचा थेट लाभ लोकांच्या घरापर्यंत पोचविण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाने गाव स्तरावरील योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली. नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे ते म्हणाले.

आमदार सुभाष धोटे म्हणाले, भारी हे गाव केवळ चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गावकऱ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे तीन वरिष्ठ आयएएस अधिकारी या गावात आले आहेत. राज्य शासन योजना तयार करते, तर प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी केली जाते. या उपक्रमाची अतिशय चांगली तयारी जिवती तालुका प्रशासनाने केल्याचे आमदार धोटे यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यात दत्ता तोगरे, नामदेव चव्हाण, योकिंद राठोड यांना पीक कर्ज मंजुरीपत्र, वैष्णवी जाधव, आरती सुर्यवंशी, दामिनी कोटनाके यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य, अश्विनी वाघमारे, सुरक्षा इंगोले, राधिका मडावी व इतर जणांना नवीन केशरी शिधापत्रिका, मोहन नागोसे, मधुकर बावणे, पारुबाई दौरे यांना दुधाळ गट वाटप, आंबीबाई मडावी, अंकूश मर्डेवाद यांना पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप, गजानन राठोड, राखी लिंगनवाड यांना संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र, गोविंदा जाधव, भीमबाई कोडापे यांना श्रावणबाळ योजना मंजूर करण्यात आली. याशिवाय लाभार्थ्यांना कृषी, आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, आरोग्य व इतरही विभागाच्या योजना मंजूर करण्यात आल्या आहे.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.