पंतप्रधान संविधान प्रास्ताविका वाचणार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नागपूर, दि. २४ नोव्हेंबर: आगामी २६ नोव्हेंबर हा संविधान दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करणार आहेत. परंतु पुरोगामी महाराष्ट्र सरकारने २६ नोव्हेंबरबाबत कोणताही कार्यक्रम जाहीर केलेला नाही. पुरोगामी महाराष्ट्र काय करणार, असा सवाल संविधान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे यांनी उपस्थित केला आहे.
खोब्रागडे म्हणाले की, केंद्र सरकार संविधानाचा जागर राष्ट्रीय स्तरावर करणार आहे. हा राष्ट्रीय उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी स्वत: संविधान २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रास्ताविकेचे वाचन करणार आहेत. यादरम्यान केंद्र सरकारअंतर्गत येणाऱ्या विविध विभागांच्या सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले जाईल. यावेळी इतरांनीही संविधान प्रस्ताविकेचे वाचन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
त्यांनी सांगितले की, संविधान फाऊंडेशनने संविधान प्रास्ताविकेचे वाचन राष्ट्रीय स्तरावर करण्याचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठविले होते. केंद्र सरकारने त्याची दखल घेऊन पंतप्रधान मोदी यांच्यापुढे विषय मांडला. त्यावर पंतप्रधानांनी स्वत:च या प्रास्ताविकेचे वाचन करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत संविधान फाऊंडेशनला कळविण्यात आले. पहिल्यांदाच संविधानाचा राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याच वेळी पुरोगामी असलेल्या महाराष्ट्र सरकारने अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्र सरकारच्या संविधान दिनाचे काय, असा प्रश्न खोब्रागडे यांनी उपस्थित केला आहे.
Comments are closed.