Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रानटी हत्तीचा जारावंडीत धुडगूस

जारावंडीत हत्तीने एका गोदामाचा दरवाजा तोडून मातीच्या घराची नासधूस केली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि, १३ : गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे आधीच त्रस्त शेतकरी असून हवालदिल झाला आहे .मागील दोन वर्षापासून उत्तर व पूर्व भागात धुमाकूळ घातलेल्या रानटी हत्तींच्या कळपातून भरकटलेल्या एका हत्तीने एटापल्ली तालुक्यातील जारावंडीत हत्तीने एका गोदामाचा दरवाजा तोडून मातीच्या घराची नासधूस केल्यांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओडिसा राज्यातील छत्तीसगडमार्गे जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कळपाने धानोरा, कुरखेडा, आरमोरी, देसाईगंज तालुक्यातील ग्रामीण भागात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान या हत्तींनी केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या रानटी हत्तींचा उपद्रव सातत्याने वाढत असल्याने वनविभागही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. अशातच गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील कसनसूर वनपरिक्षेत्रातील जारावंडी येथे कळपातून भरकटलेल्या एका नर हत्तीने धुडगूस घातला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हत्तीने जारावंडी येथील धान्य गोदामचा लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तसेच नजीकच्या एका  शेतकऱ्याच्या घराचीही तोडफोड केली. प्रथमच जिल्ह्याच्या दक्षिण भागात रानटी हत्तीचे आगमन झाल्याने हत्तींनी आपला मोर्चा आता दक्षिण गडचिरोलीत वळविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रानटी हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

हत्तीला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका; वनविभागाचे नागरिकांना आवाहन.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भामरागड वनविभागांतर्गत कसनसूर वनपरिक्षेत्र कार्यालयाने परिसरातील नागरिकांना एका पत्रकाद्वारे खबरदारीचे आवाहन केले आहे. रानटी हत्ती दिसल्यास त्रास देण्याचा प्रयत्न करू नये अथवा सेल्फीसाठी जवळ जाऊ नका, फटाके फोडू नका, दगड मारू नका. अन्यथा हत्तींकडून हल्ला होण्याची शक्यता असते, हत्ती आपल्याला दिसताच वनरक्षक, वनपाल यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

 

Comments are closed.