Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेकडो शिक्षक करोना संक्रमित.

23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 ते 12 वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय? शाळेत न बोलावण्याची शिक्षक संघटनांची मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क  २२ नोव्हें :- राज्यात सोमवापासून शाळा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या करोना चाचण्या करण्यात येत होत्या. यामध्ये राज्यातील शेकडो शिक्षक करोना संक्रमित असल्याचे समजत आहे. मुंबई, ठाणे येथे विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणार नसले, तरी शिक्षकांना मात्र शाळेत बोलावणार आहेत. मात्र अनेक शिक्षकांना करोनाची बाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर, शिक्षकांनाही शाळेत न बोलवता त्यांना ऑनलाइन अध्यापन करू द्यावे, अशी मागणी शिक्षक संघटना करत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोमवारपासून राज्यात नववी, दहावी व बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पालक, शिक्षकांचा वाढता दबाव लक्षात घेता, हा निर्णय राज्य सरकारने स्थानिक प्रशासनावर सोडला. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथे शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र काही भागात शाळा सुरू होत आहेत. दुसरीकडे, काही भागात विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासानाने घेतला असला, तरी ५० टक्के उपस्थितीच्या नियमांनुसार शिक्षकांना शाळेत बोलविले जाणार आहे.

नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या करोना चाचणीमध्ये नाशिक येथे ३४, कोल्हापूर १७, बीड २५, नांदेड ११, उस्मानाबाद ४७, नागपूर ४१,अकोला ६२, यवतमाळ १४, वर्धा २४,गडचिरोली 37 आणि औरंगाबाद ७२ इतके शिक्षक करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सातारा जिल्ह्यात आठ हजार ७९० शिक्षकांची अँटिजेन तपासणी झाली. त्यामध्ये ५० शिक्षकांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नसली, तरी येथेही काही शिक्षक पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच अनेकांचे चाचणी अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. यामुळे आता शिक्षकांना शाळेत न बोलावता ऑनलाइनच अध्यापन करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.