Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देव मार्कंडाच्या वैनगंगेत खोल पाण्यात बुडणाऱ्या तिघांना पोलिसांनी वाचवले

क्षणाचाही विलंब न लावता कौशल्य जलतरणपटू, पोलीस शिपाई बाबासाहेब वासनिक यांनी नदीत उडी; तत्परतेने टळली मोठी दुर्घटना...

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर,

देव मार्कंडा येथील वैनगंगेच्या खोल पाण्यात काल मृत्यूचा स्पर्श क्षणभर जाणवला; पण पोलिसांच्या धैर्यवान हातांनी त्या संकटालाच पराभूत केले. एका क्षणाच्या शौर्याने तीन कुटुंबांचे दिवे विझण्यापासून वाचले आणि गडचिरोली पोलिस दलाची ‘संकटात पुढे, जनतेसोबत खंबीर’ ही ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली…

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या देव मार्कंडा मंदिर यात्रेच्या गर्दीत काल सायंकाळी वैनगंगा नदीच्या पात्रात घडलेली बुडण्याची घटना काही क्षणांसाठी थरार, भीती आणि हताशेचे चित्र उभे करणारी ठरली; मात्र गडचिरोली पोलिस दलाच्या शौर्याने आणि प्रशिक्षित स्विमरांच्या अद्वितीय धाडसाने मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या तिघा युवकांना अक्षरशः जीवनदान मिळाले. यात्रेचा उत्साह, नदीकाठची गर्दी आणि पाण्याच्या प्रवाहाचा अनपेक्षित वेग — या सगळ्यांच्या संगमात निर्माण झालेल्या संकटावर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता मात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित शेंडे (वय १६, रा. मुल, जि. चंद्रपूर) हा आपल्या मित्रांसह यात्रेसाठी आला होता. सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास वैनगंगा नदीत अंघोळीसाठी उतरल्यावर खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो अचानक गटांगळ्या खात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याचे दोन मित्रही पाण्यात उतरले; परंतु पोहण्याचे पुरेसे कौशल्य नसल्याने तिघेही काही क्षणांत प्रवाहाच्या तावडीत सापडले. नदीच्या पात्रात निर्माण झालेली ती धडपड पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर तैनात पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस शिपाई तसेच आपदा मित्र आपत्ती व्यवस्थापक अधिकारी निलेश तेलतुंमडे यांनी कोणतीही औपचारिकता न करता थेट बचावकार्य सुरू केले. या निर्णायक क्षणी जिल्हा पोलिस दलातील प्रशिक्षित जलतरणपटू पोलीस शिपाई बाबासाहेब विलास वासनिक आणि गोपाळ हणमंय्या आलाम यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने नदीत झेप घेतली. खोल पाण्यातील प्रवाहाला छेद देत त्यांनी तिन्ही युवकांपर्यंत पोहोचत एकामागून एक त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. काही मिनिटांचा हा संघर्ष तीन कुटुंबांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिलासा ठरला.

या कारवाईत बाबासाहेब वासनिक यांचे धैर्य विशेषत्वाने अधोरेखित झाले. व्हीआयपी सुरक्षा पथकात कार्यरत असले तरी ते राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेले कुशल जलतरणपटू आहेत. समुद्र, नदी आणि खोल पाण्यातील त्यांच्या दीर्घ अनुभवाने या प्रसंगी निर्णायक भूमिका बजावली. केवळ पोहण्यात निपुण असणे एवढ्यावर न थांबता त्यांनी अनेक तरुणांना पोलीस भरतीसाठी मोफत प्रशिक्षण देत सक्षम घडवले आहे. त्यांच्या हातून तयार झालेले अनेक युवक आज पोलीस दलात कार्यरत असून, त्या परंपरेचेच प्रतिबिंब कालच्या धाडसी बचावकार्यात दिसून आले.

बचावानंतर तिन्ही युवकांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले. सुदैवाने तिघांची प्रकृती स्थिर असून ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. उपस्थित भाविकांनी आणि नागरिकांनी पोलिसांच्या समयसूचकतेचे मनापासून कौतुक केले. काही क्षणांपूर्वी भयाने गोठलेले वातावरण पोलिसांच्या धैर्यामुळे दिलासादायी टाळ्यांच्या गजरात परिवर्तित झाले.

दरम्यान, यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सतत दक्ष असून नदीकाठ, गर्दीची ठिकाणे आणि प्रमुख मार्गांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज ठेवून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनीही नदीत उतरताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.