१६ नोव्हेंबरपासुन राज्यात मंदिरे सुरू होणार.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई :- १६ नोव्हेंबरपासुनराज्यात मंदिरे सुरू करण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे. आणि प्रार्थनास्थळे उघडत आहोत, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील धार्मिकस्थळं उघडण्यात येत असल्याची घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून मंदिरं सुरू करण्याच्या सुरू असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी धार्मिकस्थळं उघडण्याची घोषणा करून दिवाळी निमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे.
मंदिरं सुरू करण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहनही केलं आहे. दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही.
महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच, असं सांगत यापुढेही शिस्तीचं पालन करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
प्रार्थनास्थळे खुली केल्यानंतर सर्वांना नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा आणि स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा. मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका, असे काही नियम यात नमूद करण्यात आले आहे.
Comments are closed.