Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत कोरोनाच्या भीषण परिस्थिती, ‘कुठे आहेत आमचे खासदार,’ लोकांचा सवाल?

'आमचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या गरजेच्या वेळी कुठे आहेत', असा सवाल आता वाराणसीची जनता विचारू लागली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वाराणसी डेस्क 06 मे:- वाराणासीत पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. हॉस्पिटल्समध्ये बेड्स नाहीत, ऑक्सिजन नाही, अॅम्बुलन्ससुद्धा मिळत नाही. इतकंच नाही तर कोरोना चाचणी करण्यासाठीही आठवडाभर वाट बघावी लागतेय.

गेल्या दहा दिवसात औषधांच्या दुकानांमध्ये व्हिटॅमिन सी, झिंक आणि पॅरासिटमॉलसारख्या साध्या औषधांचाही तुटवडा निर्माण झालाय. शहरातल्या आरोग्य सेवेतील एका कर्मचाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं, “हॉस्पिटल बेड किंवा ऑक्सिजनसाठी आम्हाला दररोज बरेच फोन येतात. साध्या-साध्या औषधांचाही तुटवडा आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की काही नसण्यापेक्षा काहीतरी असावं म्हणून लोक मुदत उलटून गेलेली औषधंही घेत आहेत.”

मार्च महिन्यातच संकटाची चाहुल लागायला सुरुवात झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये सरकारने निर्बंध घालायला सुरुवात केली. परिणामी परराज्यातले कामगारही आपापल्या गावांकडे परतू लागले. खचाखच भरलेल्या ट्रेनमधून वाराणासी आणि आसपासच्या गावांमध्ये लोक येऊ लागले.

29 मार्चला होळी होती. अनेकजण होळीसाठी गावी परतले. तर काही जण ग्रामपंचायत निवडणुकांसाठी गावी गेले. तज्ज्ञांनी सल्ला देऊनही त्याकडे दुर्लक्ष करत 18 एप्रिल रोजी निवडणुका घेण्यात आल्या.

निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या 700 शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि निवडणुकांमुळे कोरोना अधिक पसरला, असं पत्रकारांचं म्हणणं आहे. Varanasi ghat

वाराणासीत आतापर्यंत 70,612 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोना संसर्गामुळे 690 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 एप्रिलनंतर 60% म्हणजे 46,280 रुग्णांची नोंद झाली, यावरूनच परिस्थितीच्या गांभीर्याचा अंदाज बांधता येईल.

सरकारी आकडेवारीनुसार वाराणसी शहरात दररोज 10 ते 11 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू होतोय. रविवारी ही संख्या 16 होती. मात्र, वाराणासीत कुणाशीही बोलल्यावर या आकडेवारीवर त्यांचा अजिबात विश्वास नसल्याचं दिसतं.प्रशासनाने दहा दिवसांपूर्वीच एक नवीन मोक्षधाम सुरू केलं आहे. तिथेही दिवस-रात्र अंत्यसंस्कार सुरू असल्याचं रहिवासी सांगतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.